गोंदिया जिल्ह्यात संततधार पाऊस

गोंदिया : टीबीटोली येथील लोकवस्तीत साचलेले पाणी.
गोंदिया : टीबीटोली येथील लोकवस्तीत साचलेले पाणी.

गोंदिया : आठवडाभर कुठे तुरळक; तर कुठे संततधार बरसलेल्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. आज बुधवारी दुपारपर्यंत पाऊस सुरू होता. या पावसामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली असून तिरोडा तालुक्‍यातील बेलाटी खुर्द येथील पुरुषोत्तम अनंतराम कटरे यांच्या घराची भिंत कोसळून म्हैस ठार झाली. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मंगळवारी सकाळपासून दुपारी तीनपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. दरम्यान, मुसळधार पाऊस झाला. तब्बल दीड ते दोन तास पडलेल्या या पावसाने सायंकाळी थोडी उसंत घेत रात्रभर जोरदार हजेरी लावली. बुधवारी दुपारपर्यंत दमदार पाऊस सुरू होता; तर जिल्ह्याच्या आठही तालुक्‍यांत पावसाची सायंकाळपर्यंत रिपरिप सुरूच होती. या पावसामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातील इटखेडा ते सिरोली तसेच बोरी ते कोरंभीटोला मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे. हे मार्ग बंद करण्यात आले आहेत. तिरोडा तालुक्‍यातील लोधीटोला येथील बसंतलाल नागपुरे यांचे घर मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अंशतः पडून 40 हजार रुपयांचे नुकसान झाले. बेलाटी खुर्द येथील पुरुषोत्तम अनंतराम कटरे यांच्या घराची भिंत कोसळून एक म्हैस ठार झाली. खैरलांजी येथे 5 घरे अंशतः पडून 75 हजार रुपयांचे; तर चांदोरी येथे एक घर पडून 15 हजार रुपयांचे नुकसान झाले. उमरी येथे तीन घुरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घाटकुरोडा येथील एक घर, पाटीलटोला येथील दोन घरे, बिरोली येथील एक घर कोसळून अंदाजे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले. कवलेवाडा येथे पाच घरे, बेलाटी येथे दोन घरे कोसळून जवळपास 95 हजारांचे नुकसान झाले. डोंगरगाव येथील दोन घरे, खडकी येथील तीन घरे, चांदोरी खुर्द येथील एक घर, काचेवानी येथील 3 घरे, बेरडीपार येथील 5 घरे, डब्बेटाला येथील एक घर कोसळून लाखोंचे नुकसान झाले. अर्जुनी मोरगाव येथे तीन घरे व दोन गोठे पडलीत. विहीरगाव येथे मध्यरात्री आलेल्या पावसात नरेंद्रकुमार चैतराम मुरे यांच्या घराची भिंत, प्रभू सीताराम पाटील यांचा गोठा, बिरसी येथील प्रीतीलाल रावजी रहांगडाले यांचा गोठा, लाखेगाव येथील शैलेंद्र शालिकराम पटले यांचा गोठा पूर्णतः कोसळला. नवेगाव येथे 3 घरे, केसलवाडा येथे 6 घरे अंशतः पडली. मनोरा येथील एक घर पूर्णतः पडले. अर्जुनी मोरगाव तालुक्‍यात 2 घरे पूर्णतः तर, 62 घरे अंशतः पडली.
सडक अर्जुनी तालुक्‍यातील मार्गावरील पूल धोकादायक स्थितीत आहे. रात्रीच्या पावसामुळे या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पुजारीटोलाचे चार दरवाजे उघडले
साखरीटोला : सालेकसा तालुक्‍यातील पुजारीटोला धरणाचे चार दरवाजे मंगळवारी सायंकाळी सात वाजता 1 फुटाने उघडण्यात आले. त्यामुळे बाघ नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी दोन गेट 1 फुटाने उघडण्यात आले होते. त्यानंतर सात वाजता पुन्हा दोन गेट उघडण्यात आले. येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
चार तालुक्‍यांत अतिवृष्टी
मंगळवारी व बुधवारी झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून, चार तालुक्‍यांत अतिवृष्टीची नोंद हवामान खात्याने केली आहे. तिरोडा तालुक्‍यात 116.00 मि.मी., अर्जुनी मोरगाव 72.96, सडक अर्जुनी 72.53 तर गोरेगाव तालुक्‍यात 67.40 मि. मी. पाऊस पडला असून, अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.
इंटरनेटसेवेला फटका
या पावसाचा इंटरनेटसेवेलाही फटका बसला असून, मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सायंकाळपर्यंत ही सेवा बंद होती. त्यामुळे शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालयांतील कामकाज ठप्प पडले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com