पावसाची दडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

नागपूर ः शहराच्या काही भागात आज तुरळक सरी कोसळल्या. परंतु कालपासून पावसाने दडी मारली असून आज नागपूरकरांना उन्हाचे चटकेही जाणवले. शहरात अद्यापही हवा तसा पाऊस पडला नसल्याची चर्चा आहे. ग्रामीण भागातही काही तालुके कोरडे असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. मात्र आकडेवारीनुसार पावसाने सव्वा दोन महिन्यात सरासरी गाठल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सव्वा दोन महिन्यात 679 मिलिमिटर पाऊस झाला.
नागपूर शहर व ग्रामीण भागात 1 जून ते आज, 10 ऑगस्टपर्यंत 679.7 मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात भिवापूर तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस 871 मिलिटमिटर पाऊस पडला. जिल्ह्यात एकूण पावसाने सरासरी गाठल्याचे दिसत असले तरी सावनेर, कळमेश्‍वर, पारशिवनी तालुक्‍यात सव्वादोन महिन्यात सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला. आणखी चार दिवस पावसाची शक्‍यता नसून 15 ऑगस्टपासून वीजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागपूरकरांना आणखी चार दिवस उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहे. राज्याच्या एका भागात पावसाने कहर केला असला तरी नागपूर जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस न पडल्याने अनेक जलसाठे कोरडे आहेत. पावसाळ्याचे दोन महिने लोटले असून ऑगस्टमध्ये नागरिक पावसाची अपेक्षा व्यक्त करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raining stop