'राईनपाडा' प्रकरणाची एसआयटी चौकशी हवी - धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

नागपूर - राईनपाडा येथील प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात यावे. तसेच, या खटल्याची सुनावणी जलदगतीने पूर्ण करावी, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत केली.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्‍यातील राईनपाडा येथे अफवांमुळे बळी गेलेल्या पाच जणांच्या मृत्यूप्रकरणी आयोजित अल्पकालीन चर्चेत ते बोलत होते. मुंडे म्हणाले, की पाच जणांच्या कुटुंबांना 25 लाख रुपयांची मदत करून त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी.

भविष्यात अशा प्रकारच्या घटना घटू घडू नयेत, याची जबाबदारी घ्यावी. तसेच, मुद्रित आणि इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांना सोशल मीडिया वरचढ झाला आहे. सोशल मीडियावरून अफवा पसरू नये, यावर प्रतिबंध घालणारा कायदा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

गोऱ्हे-मुंडे यांच्यात वाक्‌युद्ध
राईनपाडाच्या अल्पकालीन चर्चेदरम्यान दुसऱ्या क्रमाकांवर उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सेनेच्या नीलम गोऱ्हे यांचे नाव पुकारले. त्या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चर्चेत त्यांचे नाव दुसऱ्या क्रमाकांवर असल्यामुळे त्यांना बोलू द्यावे, अशी मागणी केली. तुम्हाला मला बोलू द्यायचे नाही, असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी मुंडे यांच्यावर केला. त्यानंतर उपसभापतींनी हस्तक्षेप करून मुंडे यांना बोलण्यास संधी दिली.

Web Title: rainpada hatyakand case SIT inquiry Dhananjay Munde