पुनर्वसू नक्षत्रातही पावसाची पाठ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

यवतमाळ : मृग व आद्रा नक्षत्रापाठोपाठ पुनर्वसूनक्षत्रातही पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांत धास्ती निर्माण झाली आहे. याशिवाय उकाडा वाढल्याने कोरडवाहू शेतीपिके धोक्‍यात आली आहेत.

यवतमाळ : मृग व आद्रा नक्षत्रापाठोपाठ पुनर्वसूनक्षत्रातही पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांत धास्ती निर्माण झाली आहे. याशिवाय उकाडा वाढल्याने कोरडवाहू शेतीपिके धोक्‍यात आली आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ 13 टक्के पर्जन्यमान झाले आहे. मृगनक्षत्रावर अनेक शेतकरी धूळपेरणी करतात. यंदा 80 हजार हेक्‍टरवर झालेली धूळपेरणी उलटली होती. आद्रामध्ये दमदार पाऊस होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. मात्र, झाले उलटेच. आद्रापाठोपाठ सहा जुलैपासून सुरू झालेले पुनर्वसूनक्षत्रही कोरडे जात असल्याने पिके धोक्‍यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांत धास्ती निर्माण झाली आहे.
जनावरांचा प्रश्‍न कायम
पावसाळा सुरू होऊन आज दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. सर्वच नक्षत्र कोरडे गेले आहे. जिल्ह्यात एकाही नदी-नाल्यांना पूर न गेल्याने जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालक अडचणीत आले आहेत.
प्रत्येक दिवस कोरडा
शेतकऱ्यांसह नागरिक पावसाची आतुरतेने वाट बघत असताना प्रत्येक दिवस कोरडा जात आहे. सोमवारी (ता. 15) संपूर्ण जिल्ह्यातील एकाही तालुक्‍यात एक थेंबही पाऊस झाला नाही. ढग येतात आणि परत जातात. पावसाच्या लहरीपणामुळे व वाढत्या उष्णतेमुळे शेतीपीके धोक्‍यात आली आहेत.

पावसाची प्रतीक्षा केल्याशिवाय पर्याय नाही. आणखी तीन ते चार दिवस शेतीपीके तग धरू शकतात. कोरडवाहू शेतकऱ्यांनी पिकांना कुठल्याही रासायनिक खतांची मात्रा देऊ नये. द्यावयाची झाल्यास फवारणीच्या माध्यमातून द्यावी. आंतरमशागतीचे कामे करून पिकांना मातीचे आच्छादन करावे.
- सुरेश नेमाडे,
वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainy season also in the rehabilitation board