कळमना बाजार, वसतिगृहात पोलिसांच्या राहण्याची सोय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

नागपूर - पावसाळी अधिवेशनासाठी अडीच ते तीन हजार अतिरिक्त पोलिसांची गरज भासणार आहे. त्यांची कळमना बाजाराचे गोदाम, विविध शासकीय वसतिगृह, क्रीडासंकूल तसेच लग्नाच्या हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

नागपूर - पावसाळी अधिवेशनासाठी अडीच ते तीन हजार अतिरिक्त पोलिसांची गरज भासणार आहे. त्यांची कळमना बाजाराचे गोदाम, विविध शासकीय वसतिगृह, क्रीडासंकूल तसेच लग्नाच्या हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

चार जुलैपासून होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाची माहिती देताना अनुपकुमार यांनी सांगितले, की रामगिरी, देवगिरी, रविभवन, नागभवन, आमदार निवास, विधानभवन आणि इतर शासकीय निवासस्थानाच्या देखभाल दुरूस्तीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. जून अखेरपर्यंत संपूर्ण व्यवस्था करण्यात येईल. बांधकाम विभागाकडून २५ कोटींच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या आहे.

तीन आठवडे अधिवेशन चालणार असल्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या असल्या तरी प्रशासनाकडून चार आठवड्यांची तयारी केली जात आहे. 
पावसाळा लक्षात घेता जवळपास सर्वच ठिकाणी वॉटर प्रुफ टेंट तयार करण्यात येणार आहेत. पावसाळी अधिवेशना दरम्यान मोर्चे कमी राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या तुलनेत पोलिस बंदोबस्त कमी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंग, उपायुक्त के.एन.के. राव, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, परिवहन अधिकारी शरद जिचकार यावेळी उपस्थित होते. 

भाडेतत्त्‍वार घेणार वाहन
शासकीय वाहने अधिग्रहित करण्याचे यंदा टाळण्यात आले आहे. त्याऐवजी भाडेतत्त्‍वावर वाहने घेण्यात येतील. त्याचप्रमाणे ओला कंपनीकडून २०० वाहनांचा पुरवठा होणार असून कंपनीशी करार करण्यात आला आहे. १००० ते १२०० रुपये प्रति दिवस प्रमाणे त्यांना पैसे देण्यात येतील. ओला शंभर ग्रीन टॅक्‍सी, तर शंभर पेट्रोल-डिझेलवरील टॅक्‍सीचा पुरवठा करण्यार आहे. ग्रीन टॅक्‍सीमुळे प्रदूषण कमी होणार असल्याचा दावा विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केला. 

Web Title: rainy session police residence