भावाला समर्पिले देशासाठी, आता पर्वा कशाची

File photo
File photo

नागपूर : "सोनियाच्या राती उजळल्या मोती... ओवाळीते भाऊराया.. वेड्या बहिणीची वेडी ही माया...' हे गीत रक्षाबंधनाच्या दिवशी कुठल्याही बहिणीच्या कानावर पडले तर, तिच्या मनात आपल्या भावाची आठवण दाटून येते.
एकुलता एक भाऊ, कोसो दूर.. ऊन, वारा, पाऊस सगळे आपल्या अंगवार झेलणारा, देशसेवेसाठी तत्पर असणारा परंतु, बहिणींच्या कुठल्याच सुख, दुःखात त्याची साथ लाभत नाही. रक्षाबंधनालाही तो तिकडे सीमेवर आणि बहीण दारात वाट पाहत.. आपला भाऊ येणार आणि आपण त्याला राखी बांधणार या आशेवर.. पण देशप्रमासाठी बहिणीच्या प्रेमाचा त्याग करीत सैनिक सीमेवर लढत असतात.
संपूर्ण देशात बहीण-भाऊ एकत्रित येऊन, रक्षाबंधन साजरे करीत असताना सैनिक असलेला भाऊ मात्र, हजारो कोस दूर, जंगलात, नक्षलवादी भागात अतिशय जोखमीच्या परिस्थितीत सैन्यात आपल्या जबाबदारीवर तैनात असतो. तेव्हा त्याच्या बहिणीच्या मनात असंख्य उमाळे फोडणारा गहिवर दाटून येतो. परंतु, अशाही स्थितीत आपल्या भावाला देशासाठी समर्पित केल्याचा अभिमान बाळगत या बहिणी आपल्या वेड्या मनाची समजूत घालीत असल्याच्या भावना, सैनिक भगिनींनी "सकाळ'कडे रक्षाबंधनानिमित्त व्यक्त केल्यात.
डोळे भरून येतात
रोहिणी जयकुमार कडू यांचे भाऊ राजेश भुसारी पंधरा वर्षांपासून, सीआरपीएफमध्ये कार्यरत आहेत. त्यांना आजवर जम्मू, काश्‍मीर, कोलकाता, दिल्ली इत्यादी ठिकाणी पोस्टिंगवर जावे लागले आहे. सैनात गेल्यापासून, एकही रक्षाबंधन त्यांनी आपल्या ताईसोबत साजरे केले नाही. टीव्हीवर जेव्हा बहीण-भावांचे कार्यक्रम दाखविले जातात तेव्हा प्रत्येक वेळी भावाची आठवण येते. रक्षाबंधनाला तर, सकाळपासूनच भावाच्या आठवणींनी डोळे भरून येतात. इतर दोन भाऊ असूनही, दूर राहणाऱ्या भावाची सर्वांत जास्त आठवण येत असल्याचे रोहिणी यांनी सांगितले.
देशाला वाहिला भाऊराया
आम्हा चार बहिणींना एकटाच भाऊ सचिन कडवे हा 14 वर्षांपासून आर्मीमधे गेला. विविध नक्षली भागात पोस्टिंग मिळत असल्याने, रक्षाबंधनाला कधीच त्याला आमची राखी पोहोचत नाही. आमचे वडील वारले तेव्हाही तो तिसऱ्या दिवशी घरी पोहोचू शकला. आपल्या प्रेमासाठी आणि स्वार्थासाठी त्याला त्यांच्या जबाबदारीपासून, दूर ओढण्याचा प्रयत्न आम्हीही कधीही केला नाही. त्यामुळे आम्ही कधीच त्याला राखीही बांधली नसल्याचे मंगला निखिल खोब्रागडे यांनी सांगितले.
दहा बहिणींचा एकटाच भाऊ
आम्ही बारा बहिणी होतो, त्यातील दोघींचे निधन झाल्याने, आता दहा बहिणी आहोत. आम्हाला एकच भाऊ आहे. तोही सैन्यात गेल्याने, आमच रक्षाबंधन, भाऊबीज हे सणच होत नाहीत. भाऊ इतक्‍या दूर राहतो. जिवाला घोर लागून राहतो. परंतु, या दहा बहिणींबरोबरच देशातील दहा लाख बहिणींची माया आर्मीतील भाऊ संतोष तुकाराम देवगडे यांच्यासोबत असल्याने, आम्ही निर्धास्थ झोपत असल्याचे पुष्पा गणेश चिकनकर यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com