रामटेकमध्ये सेना-भाजप कार्यकर्ते भिडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

रामटेक - शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पुकारण्यात आलेल्या रामटेक बंददरम्यान शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते परस्परांशी भिडले. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

रामटेक - शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पुकारण्यात आलेल्या रामटेक बंददरम्यान शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते परस्परांशी भिडले. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

आजच्या बंदला व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून समर्थन दर्शविले. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते तालुकाध्यक्ष विवेक तुरक, बिकेंद्र महाजन, संजय झाडे, सुरेश गायकवाड यांच्या नेतृत्वात व्यापारीपेठेत फिरत होते. भाजपचे नगरसेवक तसेच सत्तापक्ष नेते आलोक मानकर व दुमदेव मानकर यांचे बाबा हॉटेल सुरू असल्याचे बघून सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी हॉटेलसमोर जमा झाले. त्यांनी हॉटेल बंद करा अशी विनंती केली. मात्र, आलोक व दुमदेव मानकर यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे शिवसैनिकांनी हॉटेलचे सामान फेकण्यास सुरुवात केली. ही फेकाफेक सुरू असताना आलोक मानकर यांनी नगराध्यक्ष आणि आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना माहिती दिली.

त्यामुळे नगराध्यक्ष दिलीप देशमुख, नगरसेवक संजय बिसमोगरे, रामानंद अडामे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले, नगरसेवक आणि कार्यकर्ते त्याठिकाणी आले. तोपर्यंत आंदोलक शिवसैनिक गांधी चौकात गेले होते. पाठोपाठ भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी तेथे धडकले. दोन्ही गट समोरासमोर आले आणि बाचाबाचीवरून हाणामारीला सुरुवात झाली.

दरम्यान, पोलिस उपअधीक्षक लोहित मतानी, ठाणेदार पारधी यांनी शिवसेनेचे बिकेंद्र महाजन यांना ताब्यात घेतले. तरीही भाजपचे कार्यकर्ते त्यांना मारहाण करीत होते. पोलिस उपअधीक्षक मतानी यानांही जमाव धक्काबुक्की करीत होता. परिस्थिती चिघळण्याची शक्‍यता असल्याने लोहित मतानी यांनी लाठीमार करण्याचा आदेश दिला. लाठीमारामुळे जमाव सैरावैरा पळू लागला. त्यात भाजपच्या स्वीकृत नगरसेविका वनमाला चौरागडे यांना धक्का लागून त्या खाली पडल्या. त्यांच्या डोक्‍याला दुखापत झाली असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी शिवसेनेचे बिकेंद्र महाजन, विवेक तुरक, संजय झाडे, भाविसेनेचे अध्यक्ष धीरज राऊत, चुन्नीलाल चौरसिया, हिमांशू पानतावणे यांना तसेच भाजपचे नगराध्यक्ष दिलीप देशमुख, नगरसेवक संजय बिसमोगरे, आलोक मानकर, रामानंद अडामे, संजय मुलमुले, शहराध्यक्ष आनंद चोपकर, स्वप्निल खोडे यांना ताब्यात घेतले. संजय बिसमोगरे आणि रामानंद अडामे यांनी सेनेचे विवेक तुरक, बिकेंद्र महाजन, महेश बिसन, दत्तू आकुलवार, हिमांशू पानतावणे, धीरज राऊत यांच्याविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार केली आहे. पोलिसांनी सेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंविला आहे. तसेच दुमदेव मानकर यांनी हॉटेलच्या गल्ल्यातून 12 हजार रुपये तर आलोक मानकर यांनी गळ्यातील सोन्याची साखळी शिवसैनिकांनी हिसकावून नेल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे.

Web Title: ramtek vidarbha news sena bjp member disturbance