फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे!

फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे!

नागपूर - विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ शेतीच्या एका तर काही वेळाने दुसऱ्या भागात अतिशय शिस्तबद्धपणे मधमाश्‍यांचे परागसिंचन सुरू आहे. शिवारात फुला-फुलांवर हजारो मधमाश्‍या रुंजन घालताहेत. डोळ्यांना दिसेल तेवढ्या भागात एकाचवेळी ही असल्याची कल्पना करा. अविश्‍वसनीय, अवर्णनीय आनंद देणारी ही प्रक्रिया. परंतु, खरी गंमत तर ही आहे की परागीभवन करणाऱ्या या नैसर्गिक मधमाश्‍या नव्हे तर या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत रोबो मधमाश्‍या (ड्रोन/ रोबो बी).

मधमाश्‍यांची जीवनप्रणाली ही सर्व सामजिक प्राण्यांमध्ये आदर्शवत असल्याचे समजले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये कीडनाशकांचा अतिरेकी वापर आणि हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम मधमाश्‍यांवर झाला आहे. त्यांची संख्या झपाट्याने घटली असून पीक उत्पादन आणि एकूणच मानवी जीवनाला याचा फटका बसत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. कृषी आणि अन्नधान्य निर्यातीमध्ये आघाडीवर असलेल्या नेदरलॅण्डमध्ये ८० टक्के क्षेत्रावरील पिकांमध्ये मधमाश्‍यांद्वारे परागीभवन होते. येथे मधमाश्‍यांच्या जवळपास ३६० जाती आढळतात. त्यापैकी निम्म्या जाती कीडनाशक आणि हवामान बदलामुळे संकटात सापडल्या आहेत. मधमाश्‍यांचे संवर्धन आणि पर्यायी व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून रोबो मधमाश्‍यांची कल्पना पुढे आली आहे. डेल्फ तंत्रज्ञान विद्यापीठात शास्त्रज्ञांची एक चमू यादृष्टीने संशोधन करीत असून त्यांनी अशा काही रोबो मधमाश्‍या विकसित केल्या आहेत. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातही याविषयी संशोधन सुरू असून काही बहुराष्ट्रीय कंपन्या रोबो मधमाश्‍यांचे पेटंट घेण्यासाठी सरसावल्या आहेत.

तंत्रज्ञानाच्या प्रगतीने येत्या पाच ते दहा वर्षांत अतिशय लहान आकारांचे मधमाश्‍यांचे ड्रोन तयार करणे शक्‍य होणार आहे. रोबो मधमाश्‍यांना प्रारंभी हरितगृहांमध्ये ठेवून त्यांच्यावर चाचण्या यशस्वी झाल्यानंतर शेतशिवारात हा प्रयोग राबविला जाईल, असे डेल्फ विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

अशी आहेत वैशिष्ट्ये
डेल्फ विद्यापीठात विकसित ड्रोनप्रमाणे असणाऱ्या या रोबो कीटकांचे पंख ३३ सेंटिमीटर तर २९ ग्रॅम वजन आहे. माशीच्या वजनापेक्षा ते जास्त आहे. त्यांचा आकार कमी करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. रोबो मधमाश्‍यांमध्ये असलेल्या बॅटरीच्या क्षमतेनुसार प्रारंभी सहा मिनिटे किंवा एक किलोमीटरपर्यंत त्या उडू शकतील. पंखांची उघडझाप प्रतिसेकंदाला १७ वेळा होणार आहे. यामुळे त्यांना हवेत उडत राहताना नियंत्रण ठेवणे सोपे जाणार आहे. कोणत्याही दिशेला रोबो मधमाश्‍यांना उडता येणार असून ३६० अंशांमध्येही फिरता येणार आहे. त्यांच्यात विशेष सेन्सर आणि कॅमेरा आहे. यामुळे त्यांना एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाणे आणि टक्कर टाळणे शक्‍य होणार आहे. शिवाय शेतशिवारात काम करणाऱ्या शेतकरी, मजुरांना यांचा काहीच त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.

रोबो मधमाश्‍यांची संकल्पना जरी चांगली वाटत असती तरी ती खूप खर्चिक राहील. नैसर्गिकरीत्या मधमाश्‍यांद्वारे होणारे परागीभवन आणि यांत्रिकी पद्धतीने केले जाणारे परागीभवन यांत खूप फरक शक्‍य आहे. मधमाश्‍यांचा आकार लहान, मध्यम व मोठा असतो. त्यांच्या आकाराप्रमाणे विशिष्ट फुलांना भेट देऊन त्या परागीभवनाची प्रक्रिया पार पाडीत असतात. रोबो मधमाश्‍यांद्वारे असे जमेल का, याबाबत शंकाच आहे.
- सुधाकर रामटेके, मधुमक्षिकापालक शेतकरी, उमरेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com