शाळेवर कब्जा करून मागितली खंडणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

नागपूर - गिट्टीखदानमधील रसूल प्राथमिक शाळेच्या इमारतीवर जर्मन-जपान गॅंगचा म्होरक्‍या कुख्यात गुंड अजहर खान आणि त्याच्या १० ते १२ साथीदारांनी कब्जा केला. शाळेवरील ताबा सोडण्यासाठी शाळा संचालकाला ५० लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी शाळा संचालक महिलेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

नागपूर - गिट्टीखदानमधील रसूल प्राथमिक शाळेच्या इमारतीवर जर्मन-जपान गॅंगचा म्होरक्‍या कुख्यात गुंड अजहर खान आणि त्याच्या १० ते १२ साथीदारांनी कब्जा केला. शाळेवरील ताबा सोडण्यासाठी शाळा संचालकाला ५० लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी शाळा संचालक महिलेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

समसूननिसा मोहम्मद इस्माईल पठाण (वय ६२, रा. कोराडी नाका) यांनी गिट्टीखदानमधील जाफरनगरातील टीचर्स कॉलनीत प्रोग्रेसिव्ह को-ऑपरेटिव्ही सोसायटीच्या माध्यमातून १९८७ ला मोठा भूखंड विकत घेतला होता. तेथे गरीब परिस्थिती असलेल्या लहान मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी रसूल प्राथमिक शाळा बांधली. ७ जानेवारी २०११ मध्ये गिट्टीखदानमधील कुख्यात गुंड आणि जर्मन-जपान गॅंगचा प्रमुख अजहर खानने शाळेत जाऊन समसूननिसा पठाण यांची भेट घेतली. त्याने भूखंडावर शाळा कशी बांधली? शाळा चालवायची असेल, तर ५० लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, असा दम भरत पैशाची मागणी केली. मात्र, शाळेत ज्ञानदानाचे कार्य सुरू असल्याचे सांगून शेजाऱ्यांनी अजहर खानला हुसकावून लावले होते. मात्र, २०१३ मध्ये अजहर खान आणि त्याचे साथीदार पुन्हा शाळेत आले. त्यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना जीवे मारण्याची धमकी दिली. मुलांना शाळेत पाठविल्यास त्यांचे अपहरण करण्यात येईल, अशी धमकी दिली. तेव्हापासून ती शाळा बंद पडली. त्यानंतर समसूननिसा यांच्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला. जीवाच्या भीतीने मुले शाळेकडे भटकलीच नाही. त्यानंतर १५ मे २०१७ ला समसूननिसा या मुलगी फातिमा यांच्यासोबत शाळेची स्थिती बघायला गेल्या होत्या. त्यावेळी अजहर खान, अमदज खान (वय २५), शेरा ऊर्फ वसीम खान (वय २५), राजा खान (वय २१), (सर्व रा. गंगानगर झोपडपट्टी) आणि शेराचा मित्र जावेद खान आणि अन्य दोन ते चार युवक शाळेत आले. त्यावेळी समसूननिसा या शाळेत हजर होत्या. गुंडांनी त्यांना शाळेचा ताबा पाहिजे असल्यास खंडणीची मागणी केली. समसूननिसा यांनी खंडणी देण्यास नकार दिला. त्यामुळे गुंडांनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. मारहाण करून त्यांना पळवून लावले. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

शेरा खानला गुरुवारपर्यंत पीसीआर 
गल्लीतील गुंड असलेला शेरा ऊर्फ वसीम खान हा चोऱ्या, घरफोड्या आणि रात्रीची लूटमार करीत होता. मात्र, काही पोलिसांच्या आशीर्वादाने तो वसीमचा ‘शेरा भाई’ बनला. त्याने खंडणी, वसुली आणि खाली भूखंडावर कब्जा मिळविण्यास सुरुवात केली. मात्र, एसीपी वाघचौरेच्या नजेरतून तो सुटला नाही. त्याला रविवारीच बेड्या ठोकण्यात आल्या. गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

शाळेत विकायचा दारू
अजहरने शाळा खाली करून तेथे ताबा मिळवला. त्या शाळेत त्याने अवैध धंदे सुरू केले होते. जुगारअड्डा आणि अंमली पदार्थाची तो विक्री करायचा. गिट्टीखदान ठाण्यातील तत्कालीन काही पोलिस अधिकाऱ्यांशी त्याचे साटेलोटे होते. त्यामुळे समसूननिसा यांच्या तक्रार अर्जाला नेहमी केराची टोपली दाखविली जायची. मात्र, एसीपी सोमनाथ वाघचौरे यांनी गांभीर्याने दाखल घेऊन गुंडांना बेड्या ठोकल्या. 

Web Title: The ransom was demanded by the school