नागपूरात दिराने केला वहिनीवर बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

गोपालने तिला बाम लावून मागितला. बाम चोळत असताना गोपालने शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. त्यानंतर त्याने बलात्कार केला. 

नागपूर - आजारपणात सर्वतोपरी मदत करणाऱ्या वहिनीवर दिराची वाईट नजर पडली. त्याने वहिनीच्या एकटेपणाचा फायदा घेत बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कुकृत्य केल्यानंतर गुजरातला पळून गेला. 

30 वर्षीय महिला पतीसह गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाभा परिसरात भाड्याने राहते. पती फर्निचर बनवण्याचे काम करतो. ते मूळचे वाडमेरचे (राजस्थान) आहेत. गोपाल हा महिलेच्या पतीचा चुलतभाऊ आहे. गोपाल कुटुंबासह सूरत (गुजरात) येथे राहतो. मुतखड्याचा आजार झाल्याने तो उपचारासाठी काही दिवसांपूर्वी नागपुरात आला होता. त्यावेळी तो भावाच्या घरी थांबला होता. 

पाच एप्रिलला गोपाल रुग्णालयातून घरी परतल्यानंतर भाऊ कामानिमित्त घराबाहेर निघून गेला. गोपालने घरात कुणीही नसल्याची संधी साधून महिलेशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दुसऱ्या दिवशी तो सूरतला निघून गेला. तेव्हापासून महिला तणावात होती. शेवटी तिने पोलिसांत तक्रार दिली. पोलिस गोपालचा शोध घेत आहे. 

बाम लावून देण्याचा बहाणा 
पती बाहेर गेल्यानंतर महिला स्वयंपाक घरात काम करीत होती. गोपालने तिला बाम लावून मागितला. बाम चोळत असताना गोपालने शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. त्यानंतर त्याने बलात्कार केला. 

बदनामीच्या भीतीपोटी गप्प 
महिला आठवडाभरापासून तणावात वावरत असल्याची बाब पतीला खटकली. त्याने पत्नीला विश्‍वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी तिने सर्व हकीकत सांगितली. पतीनेही पत्नीला धीर दिला. दोघेही दोन दिवस बदनामीच्या भीतीपोटी गप्प होते. त्यांनी नातेवाइकांचा सल्ला घेतला. आरोपीला शिक्षा व्हावी, या उद्देशाने पोलिसांत तक्रार दिली.

Web Title: rape case in nagpur