VIDEO : चंद्रपूरचा संबंध थेट ब्रिटेनशी? मूल तालुक्यात सापडले तब्बल दोन हजार वर्षांपूर्वीचे नाणे

Rare coin found in mool of Chandrapur
Rare coin found in mool of Chandrapur

चंद्रपूर : रोमन साम्राज्याचा शिरकाव ब्रिटेनमध्ये होण्यापूर्वी दक्षिण-पूर्व ब्रिटेनमध्ये कटूवलाऊनी या सेल्टिक जमातीचे राज्य होते. या जमातीचा दुसरा राजा टँसिओवेनस हा इ.स.पूर्व २५ ते इ.स.१० दरम्यान राज्य करीत होता. या राजाचे नाणे ब्रिटन आणि युरोपमधील वेगवेगळ्या प्रांतात आढळून येतात. आता हेच नाणे चंद्रपुरातील मूल तालुक्यातील खालवपेठ येथील विश्वनाथ गोसाई ठाकरे यांच्या संग्रही आढळून आले आहे. त्यामुळे चंद्रपूरचा संबंध थेट ब्रिटेनच्या पूर्वइतिहासासोबत जोडला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  

जिल्ह्याला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. जिल्ह्यातील विविध भागात ऐतिहासिक खाणाखुणा विखुरलेल्या आहेत. टँसिओवेनसच्या नाण्याच्या उपलब्धतेमुळे या इतिहासात आता नव्याने भर पडली आहे. दोन हजार वर्षांपूर्वी ब्रिटेनमध्ये होऊन गेलेल्या राजाचे अतिशय दूर्मिळ नाणे चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या मूल तालुक्यातील विश्वनाथ गोसाई ठाकरे यांच्या संग्रहात सापडले आहे. विश्वनाथ ठाकरे यांना नाणी संग्रह करण्याचा छंद आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या राजघराण्यांची, त्यांच्या राजांची नाणी आहेत. ब्रिटेनच्या राजाचे नाणे त्यांचे आजोबा गोविंदा विठू ठाकरे यांनी संग्रह करून ठेवले होते. संग्रहात असलेले हे नाणे टॅसिओवेनस ( इ.स.पूर्व २५ - इ.स.१०) या राजाचे असल्याचे अभ्यासक सांगतात. 

या नाण्याच्या वरच्या बाजूस 'TASCIV' (ट‌ॅसिव्ह) ही अक्षरे कोरलेली असून ती राजाचे नाव सूचित करतात. तसेच नाण्याच्या खालच्या बाजूस 'VER' म्हणजेच व 'वरलेमिओ' हे राजधानीचे ठिकाण सूचित करतात. हे नाणे गोलाकार असून १० ग्रॅम वजनाचे आहे. भारताच्या कुठल्याच भागावर टॅसिओवेनस राजाचे अंमल नव्हता. एखादे नाणे संग्रहक ब्रिटिश अधिकारी चंद्रपुरात कार्यरत असताना त्यांच्याकडील नाणे हरविले असावे आणि विश्वनाथ ठाकरे यांच्या पूर्वजांना सापडले असावे, अशी शक्यता अभ्यासकांनी वर्तविली आहे.

रोमन साम्राज्याचा शिरकाव ब्रिटेनमध्ये होण्यापूर्वी दक्षिण-पूर्व ब्रिटनमध्ये कटूवलाउनी या सेल्टिक जमातीचे राज्य होते. या जमातीचा दुसरा राजा टँसिओवेनस (इ.स.पूर्व २५ -  इ.सन १०) याचे  अतिशय दूर्मिळ प्रकारचे हे नाणे असून प्रामुख्याने ब्रिटेन व युरोपमधील वेगवेगळ्या प्रांतात ही नाणी आजवर आढळून आली आहेत. टँसिओवेनस याने आपली राजधानी वरलेमिओ येथे आणली, आणि तेव्हापासून आपल्या नावाची नाणी पाडण्यास त्याने सुरुवात केली. ब्रिटेनमध्ये रोमन साम्राज्यकाळास सुरुवात होण्यापूर्वीचा काळ लोहयुगीन काळ म्हणून ओळखला जातो. टँसिओवेनस हा याच लोहयुगीन काळातील राजा समजला होतो. त्याच्या नाण्यावरील घोड्याची प्रतिमा ही लोहयुगात असलेले घोड्याचे महत्व अधोरेखित करते.
- अमित भगत, इतिहास अभ्यासक, मुंबई

फेसबुकने उलगडला इतिहास -
मूल तालुक्यात येणाऱ्या खालवसपेठ येथे किशोर गेडाम शिक्षक पदावर कार्यरत असताना या नाण्याचे छायाचित्र त्यांनी फेसबुकवर टाकले होते. फेसबुकवरील छायाचित्र पुण्यात वास्तव्यास असलेले विनय लोणारे यांनी पाहिले. लोणारे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील इतिहास अभ्यासक झाडे यांच्याशी संपर्क साधला. निलेश झाडे यांनी मुंबई येथील इतिहास अभ्यासक अमित भगत यांना नाण्याचे छायाचित्र पाठविले. त्यांनी पुरविलेल्या माहितीमुळे या नाण्याचा अपरिचित इतिहास उजेडात आला.

मला बालपणापासून नाणी संग्रह करण्याचा छंद आहे. माझ्या संग्रहात अनेक जुनी नाणी आहेत. हे प्राचीन नाणे मला घरीच सापडले होते. माझ्या आजोबांनी ते जतन करून ठेवले होते.
-विश्वनाथ ठाकरे, खालवसपेठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com