अरेच्चा! या शहरात आढळले दुर्मिळ लांब चोचीचे गिधाड; निसर्गप्रेमी, पक्षीअभ्यासकांना सुखद धक्काच

vulture found in washim.jpeg
vulture found in washim.jpeg

वाशीम : आपल्याकडे एकेकाळी गिधाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. परंतु, गेल्या काही दशकांत गिधाडांच्या संख्येत झपाट्याने घट झाली. गिधाडे भारतातून नामशेष होणार की काय? असा प्रश्‍न उपस्थित झाला. मात्र, वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे नुकतेच ‘लांब चोचीचे भारतीय गिधाड’ आढळले आहे. याची नोंद ‘वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थे’चे सचिव शिवाजी बळी व संतोष शेटे यांनी केली आहे. 1990 नंतर मालेगाव तालुक्यातून गिधाडे दिसेनासे झाल्याची माहिती जाणकार सांगतात. त्यामुळे ही नोंद जिल्ह्याची जैवविविधता संपन्न असल्याची बाब दर्शवीत आहे.

विदर्भ म्हणजे निसर्गाचा मुक्तहस्ते वारसा लाभलेला भूभाग होय. निसर्गाचे संगोपन होण्यासाठी पशू, पक्षी, वृक्ष यांचे देखील विशेष महत्त्व आहे. 1990 पूर्वी भारतीय उपखंडात गिधाडांची संख्या सर्वाधिक होती. मात्र, मृत जनावरांवर तुटून पडणारे गिधाडे अचानक काही वर्षांतच गायब झाली. मनुष्य असो वा इतर प्राणी, त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट योग्य रित्या लावणे फार गरजेचे आहे. अन्यथा, रोगराईची दाट शक्यता असते. पूर्वी एखाद्या गावात मृत जनावर गावाबाहेर टाकल्यावर तेथे काही तासांतच शेकडोंच्या संख्येने गिधाडे उतरत. एक ते दोन तासांत मृत जनावराच्या हाडाचा सांगडाच दिसायचा. गिधाडे मृत प्राण्यांची विल्हेवाट लावून रोगराई रोखण्याचे काम पार पाडत. त्यामुळेच निसर्ग साखळीत त्यांचे वेगळेपण अधोरेखित होत असे.

गिधाड का आहे ‘निसर्गाचा सफाई कामगार’!
गिधाड हा पक्षी गरुड पक्ष्यापेक्षाही आकाराने मोठा आणि शक्तिशाली आहे. तो मृतभक्षी असल्यामुळे तो शिकार न करता इतर प्राण्यांच्या मृत शरीरावरच उदरनिर्वाह करतो. त्यामुळे तो निसर्गात सफाई कामगाराची भूमिका पार पाडून, साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतो. त्यामुळे कावळ्याप्रमाणे गिधाड हा पक्षीसुद्धा ‘निसर्गातील सफाई कामगार’ म्हणून ओळखला जातो.

गिधाडांची संख्या 1990 नंतरच का घटली?
1990 च्या दशकात ‘डायक्लोफिनॅक’ हे औषध पशुवैद्यकीय उपचारासाठी वापरात आले. विशेषतः प्राण्यांच्या अवयवांवर आलेली सूज, वेदना कमी करण्यासाठी हे औषध वापरले जात असे. त्या काळात इतर औषधांच्या तुलनेत ‘डायक्लोफिनॅक’ हे औषध स्वस्त असल्याने त्याचा वापर वाढला. या औषधाच्या वापरातून प्राण्यांचे रोग बरे होत  असले, तरी औषधातील अंश प्राण्यांच्या शरीरभर असे. परिणामी, औषधाचा वापर केलेले जनावर मृत झाल्यास त्याचे दूषित मांस खाणार्‍या गिधाडांच्या शरीरात ‘डायक्लोफिनॅक’ औषधाचे अंश जाऊ लागले. परिणामी, गिधाडांच्या मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होऊन ती मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडू लागली. त्यामुळे ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर्स (आययूसीएन)’ या संस्थेकडून हा पक्षी नष्टप्राय होत असल्याचे घोषित केले आहे. अशी माहिती पक्षी अभ्यासक शिवाजी बळी यांनी दिली.

तर संपूर्ण निसर्गसाखळी कमकुवत होईल
निसर्गातील प्रत्येक घटकाला विशेष महत्त्व आहे. सजीव सृष्टीत प्रत्येक प्राणी, पक्षी, वृक्ष यांची एक वेगळी भूमिका आहे. निसर्गसाखळीतील एखादा दुवा जरी नाहीसा झाला, तर संपूर्ण निसर्गसाखळी कमकुवत होईल, किंबहुना कोसळेल. ही बाब अतिशय धोकादायक ठरू शकते. त्यामुळे संकटग्रस्त प्रत्येक प्रजातींचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यावरच सजीव सृष्टीचे अस्तित्व अवलंबून आहे. गिधाड देखील त्यापैकीच एक पक्षी होय.
-शिवाजी बळी, सचिव वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com