(व्हिडिओ) वाहनचालक ते वकील होण्याचा प्रवास थक्क करणारा, वाचा ही यशोगाथा 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

चंद्रपुरातील रशीदचे कुटुंब तसे मोठे आहे. वडील "डिझेल मॅकेनिक' होते. घरची परिस्थिती बेताचीच. त्यामुळे रशीद शिक्षण घेऊ शकला नाही. दहावीच्या आताच त्याची शाळा सुटली. वडिलांना मदत करताना हौस म्हणून त्याने चारचाकी शिकली.

चंद्रपूर : रशीद याकूब शेख. सरसंघाचालक मोहन भागवत यांचे बंधू चंद्रपुरातील ख्यातनाम वकील रवींद्र भागवत यांचा वाहन चालक. मागील 18 वर्षांपासून तो त्यांच्याकडे कार्यरत आहे. दहावी नापास वाहन चालक ते वकील होण्यापर्यंतचा रशीदचा प्रवास थक्क करणारा आहे. भागवत कुटुंबीय एका विचारधारेसाठी ओळखले जाते. त्याच कुटुंबाने रशीदला मायेचा ओलावा दिला. भागवत कुटुंबीयांच्या परिसस्पर्शाने रशीदने वेगळी उंची गाठली आणि समाजसमोर आदर्श निर्माण केला. 

चंद्रपुरातील रशीदचे कुटुंब तसे मोठे आहे. वडील "डिझेल मॅकेनिक' होते. घरची परिस्थिती बेताचीच. त्यामुळे रशीद शिक्षण घेऊ शकला नाही. दहावीच्या आताच त्याची शाळा सुटली. वडिलांना मदत करताना हौस म्हणून त्याने चारचाकी शिकली. वाहन चलनाच्या कौशल्यामुळे भागवत कुटुंबीयांशी त्याची नाळ जुळली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चंद्रपूरचे तत्कालीन विभाग प्रचारक योगेश बापट यांनी रशीदला ऍड. रवींद्र भागवत यांच्याकडे कामासाठी पाठविले. धर्म, चालीरिती, रिवाज सारेच वेगळे. परंतु रशीदला भागवत कुटुंबीयांनी त्याची कधीच जाणीव होऊ दिली नाही. 

अधिक माहितीसाठी - शिक्षकांनो व्हा सावधान ! दहा शिक्षकांवर झाली "ही' कारवाई, काय गुन्हा होता "त्यांचा', वाचा...
 

लवकरच तो या कुटुंबातील सदस्य झाला. मागील 18 वर्षांपासून या कुटुंबीयांशी त्याची नाळ जुळलेली आहे. दरम्यान, ऍड. रवींद्र भागवत यांनीच त्याला पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त केले. रशीदने दहावीची परीक्षा दिली. मात्र, गणित विषयात तो नापास झाला. त्याला शिकवणीलाही पाठविले. चंद्रपुरातील रवी पिंपळशेंडे यांच्याकडे शिकवणी लावली. रशीद दहावी उत्तीर्ण झाला. त्यानंतर बारावी प्रथम श्रेणीत पार केले. पदवीसुद्धा प्रथम श्रेणीतच मिळविली. एवढ्यावरच थांबला नाही. त्याने कायद्याचा अभ्यास सुरू केला. कायद्याची पदवी मिळविली. याकाळात तो वाहन चालक म्हणून काम करायचा. 

रशीद वकील झाला. मात्र, ऍड. भागवत यांचा सारथी म्हणून रहायची त्याची इच्छा होती. परंतु त्यांनी त्याला कनिष्ठ अधिवक्ता म्हणून स्वत:कडे ठेवून घेतले. त्यांच्याच मार्गदर्शानात वकील क्षेत्रातील बारकावे त्याने शिकले. आता तो स्वतंत्ररीत्या वकिली करीत आहे. भागवत कुटुंबातील चार पिढ्यांच्या वकिली व्यवसायात जी माणसं घडली त्यात एक रशीद आहे. या कुटुंबाच्या परिसस्पर्शाने रशीदचे सोने झाले. पण, भागवत कुटुंबालाही रशीद वकील होत असल्याचे पाहून अभिमान वाटला. 

...आणि संस्कृत शिकली 

रशीद उर्दूमिश्रीत हिंदी बोलायचा. मराठी त्याला यायची. एकदा रवींद्र भागवत यांच्याकडे संस्कृत भारतीचे तत्कालीन प्रांत संघटनमंत्री सचिन कठाळे आले. रशीदची त्यांची भेट झाली. कठाळे यांच्या संस्कृत भाषेने तो प्रभावित झाला. भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर रशीदला स्थानिक जनता महाविद्यालयात एका महिन्याच्या संस्कृत शिकवणीच्या वर्गाला पाठविण्यात आले. त्याने परिश्रमाने या भाषेवर प्रभृत्व मिळविले. 2004 मध्ये दिल्ली येथील संवाद शाळेत रशीदने 15 दिवसांचे प्रशिक्षण घेतले. आता तो अस्खलितपणे संस्कृत बोलतो. दैनंदिन जीवनात घरीसुद्धा तो आई जमिला बेग यांच्यासोबत संस्कृतमध्ये संभाषण करतो. 
 

जीवनाचा प्रवास संस्कृतमध्ये लिहायचाय 
वाहनचालक ते वकील असा माझा प्रवास आहे. हा प्रवास संस्कृत भाषेत लिहिण्याचा माझा विचार आहे. त्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहे. लवकरच यावर मी काम सुरू करेल. 
ऍड. रशीद याकुब शेख चंद्रपूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rashid, a Sanskrit-speaking driver, became a lawyer