...इसलिए तमाम पागल अपने अद्वितीय तरीके से पागल होते हैं! 

...इसलिए तमाम पागल अपने अद्वितीय तरीके से पागल होते हैं! 

नागपूर - दुपारचे १२...सगळे आपापल्या कामात व्यस्त...कुणाला कुणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अशात रस्त्याच्या वळणावर एका कडेला पंचविशीतला तरुण नजरेत येतो...कोपऱ्यातल्या झाडाखाली बसलेला. त्यानं त्याच्यापुरती छान बैठक तयार केलेली. तिथं तो दिवसभर बसून असतो. राजासारखा... नव्हे एखाद्या कलावंतासारखा! त्यानं कुठून- कुठून जमा केलेल्या फाटक्या-तुटक्या चपला, काही किरकोळ सामान, जमिनीवर पडलेला कागदांचा खच, फाटक्या बॅनरचे-पॅम्पलेटचे एकत्र जोडून ठेवलेले कागदी चिटोरे. त्या चिटोऱ्यांवर त्यानं चितारलेली अनाकलनीय चित्रं. बरीच चित्रं त्यानं झाडाच्या फांदीला अडकवलेली...एखाद्या प्रदर्शनासारखी. तो नेमकं काय करतोय, याचा अदमास येईना, पण हे काहीतरी वेगळं असल्याचं ध्यानात यायला वेळ लागला नाही. 

तो वेडा असावा. सगळे तसंच सांगत होते. त्याचे कपडे मळलेले. फाटलेले सुद्धा असतील. दाढी राठ वाढलेली आणि केसही लांब-राठ. शहाणी माणसं असं थोडीच करतात? तो जगावेगळा. आपल्याच तालात. 

जणू त्याला जगाशी संबंध नाहीये. तो कुणाच्याच मागे फिरत नाही. कुठल्याही शिक्क्याची, नावाची, प्राज्ञेची, नोंदीची, दखलीची कणभरही गरज नाकारणारं त्याचं अद्भुत अफाट तरीही क्षुल्लक अस्तित्व! तो जगतोय त्याच बेदखल राजेपण अन कुठेही सोडून जाता येण्यासारखे स्वनिर्मित सार्वभौम साम्राज्य! 

का करतोय तो असं? काय घडलं असेल त्याच्यासोबत नेमकं? त्याच्या अनेक चित्रांपैकी एका चित्रावर तेलगू भाषेतल्या काही ओळी रेखाटलेल्या काटोलच्या नृत्य शिक्षिका पी. पद्मा यांच्या मदतीने त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला तर धक्काच बसला. बऱयाच गोष्टी असंबंद्ध. पण एका वाक्यावर लक्ष केंद्रित झालं... 'तुझ्या केसांच्या आंबाड्यात मी मोगऱ्याचा गजरा माळतोय...'...असे रोमँटिक शब्द त्यानं कां रेखाटले असतील? या त्याच्या कल्पना असतील, की खरंच प्रेमभंग झाल्यानं मनावर आघात होऊन भरकटला असेल तो? की मुद्दामच सगळे पाश सोडून दुःखाच्या खुणा खणून काढून विरक्ती उगवायला निघालाय तो? 

त्याच्या बैठकीच्या आसपास विचारपूस केली तर काही तरुण मंडळींनी त्याला रोजच पाहत असल्याचं सांगितलं. त्यातले कित्येक जण त्याला पोटासाठी लागणारं अन्न कधी-मधी पुरवायचे. जाता-येता त्याला रोज पाहणाऱ्या दोन तरुणी भेटल्या. कुठल्या तरी आघातानं त्याचं मानसिक संतुलन बिघडलं असावं, असं त्यांना वाटतं. एका तरुणाच्या मते मात्र तो वेडा नाही, आत्ममग्न आहे. प्रत्येकाचं विश्लेषण वेगळं. त्याचं स्वतःच विश्लेषण आणखी वेगळं असेल कदाचित! विश्लेषणाचा विषय आला म्हणून मानसोपचार तज्ज्ञ प्रा. राजा आकाश यांना विचारणा केली. त्याची चित्रं, चुरगाळलेले कागद आणि एकूणच अवस्थेचे काही फोटो त्यांना पाठवले. हा 'डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर'चा रुग्ण आहे, असा प्रा. राजा आकाश यांचा निर्वाळा. एखाद्या आघातानं किंवा अचानक उद्‍भवलेल्या मानसिक आजारानं विस्मृती येऊन तो भरकटला असावा. तो काढत असलेली चित्रं वास्तवदर्शी किंवा काल्पनिकही असू शकतात, असंही ते म्हणतात. अशा अवलियांच्या वर्तनाचं कोडं बऱयाचदा सुटत नसतं. अशी माणसं प्रश्नांसारखी उद्‍भवतात आणि मागं आणखी प्रश्नचिन्हं सोडून निघून जातात. तोही नाहीसा झाला अचानक. त्याचं सिंहासन तिथंच टाकून. झाडावर प्रदर्शित केलेली चित्रंही नेली नाहीत त्यानं सोबत. कधी भेटलाच तर मिळतीलाही काही प्रश्नांची उत्तरं... पण त्याच्या वेदनेचा जरासाही अदमास येण्याची असोशी छळत राहणार कदाचित...वेडी माणसं स्वतःला नि जगाला छळतात तशी...मंगेश डबराल म्हणतो तशी... 
‘‘पागल होने का कोई नियम नहीं है 
इसलिए तमाम पागल अपने अद्वितीय तरीके से पागल होते हैं 
वे भूल चुके होते हैं कि पागल होने से 
बचे रहने के कई नियम हैं...‘‘ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com