राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन उद्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

यवतमाळ - श्रीगुरुदेव सेवा मंडळ यवतमाळ व भारतीय विचार मंचतर्फे तिसरे  विदर्भस्तरीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन रविवारी (ता. आठ) येथे आयोजित केले आहे. स्थानिक डॉ. नंदूरकर विद्यालयातील साईरंजन सभागृहात सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्‌घाटन होत आहे. दोन परिसंवादांसह राष्ट्रसंतांच्या साहित्याची भरपूर  मेजवानी, या संमेलनानिमित्त गुरुदेव भक्तांसह साहित्यिक व वाचकांना मिळणार आहे.

स्थानिक राऊतनगरमधील गजानन महाराज मंदिरातून सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. या दिंडीचा डॉ. नंदूरकर विद्यालयात समारोप होणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन होईल. या वेळी स्वागताध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजूदास जाधव, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मोझरीचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, आचार्य हरिभाऊ वेरूळकर, आध्यात्मिक मंच यवतमाळचे संघटक अजय मुंधडा आदी प्रामुख्याने उपस्थित राहतील. 

या वेळी ‘ग्रामसंजीवनी’ विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. दुपारी १२  वाजता ‘राष्ट्रधर्म संकल्पना’ या विषयावर प्रा. डॉ. रमाकांत कोलते यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात अरुण नेटके, प्रा. डॉ. रेखा महाजन, प्रा. डॉ. कोमल ठाकरे सहभागी होतील.

दुपारी २.३० वाजता ‘स्वावलंबी व स्वयंपूर्ण ग्रामसंकल्पना’ या विषयावर डॉ. अशोक घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात डॉ. राजेश खवले, सतपाल सोवळे, अरुंधती कावडकर सहभागी होणार आहेत.

सायंकाळी ४ वाजता डॉ. प्रकाश नंदूरकर यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलनाचा समारोप समारंभ होईल. या वेळी भारतीय विचार मंचचे विदर्भ प्रांत संयोजक प्रा. डॉ. सुभाष लोहे मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ५ वाजता मौन श्रद्धांजली व सामुदायिक प्रार्थनेने संमेलनाचा समारोप होणार आहे.

Web Title: rashtrasant tukdoji maharaj sahitya sammelan