"कोबी घेता का हो, कोबी..पाच रुपयाला एक गठ्ठा!" शेतकऱ्यांवर आली घरोघरी जाऊन विकण्याची वेळ

rates Cabbage are fall down in market in Yavatmal district
rates Cabbage are fall down in market in Yavatmal district

पुसद (जि. यवतमाळ) : "कोबी घेता का हो कोबी.... पाच रुपयाला एक गठ्ठा!" अशी आरोळी ठोकत भाजीविक्रेते सध्या पुसद शहराच्या कॉलनीत सकाळी फिरताना दिसत आहेत. भाजी मंडई आवक वाढल्याने कोबीचे दर चांगलेच घसरले आहेत. दोन ते तीन किलो वजनाचा कोबीचा गठ्ठा केवळ पाच रुपयांत विकला जात आहे. प्रतिकिलो दोन रुपये हा दर मिळत असल्याने अपार कष्ट करून भरघोस कोबी पिकविणारा शेतकरी मात्र, नाउमेद झाला आहे.

सध्या भाजीमंडईत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. परंपरागत पिकांना फाटा देत सिंचनाची व्यवस्था असलेले पुसद परिसरातील शेतकरी भाजीपाला शेतीकडे वळले आहेत. भाजीपाला विक्रीतून नगदी पैसे मिळत असल्याने शेतकरी खूष आहेत. मात्र, बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने सध्या भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. 

बुधवारी (ता.3) भाजीमंडईत फुलकोबीची मोठ्या प्रमाणात आवक झाली. त्यामुळे कोबीला उठाव नव्हता. शेतकऱ्यांच्या कोबीला प्रतिकिलो एक ते दोन रुपये भाव मिळाला. कोबी फेकून देण्यापेक्षा हाती चिल्लर पैसे आले तरी शेतकऱ्यांनी बेभाव किमतीत कोबीची मंडईत विक्री केली. विक्रेत्यांनीही ढकल गाड्यात कोबीचे गठ्ठे भरून कॉलनीमध्ये फेरी काढली. किमान दोन-तीन किलो वजनाच्या कोबी गठ्ठाला केवळ पाच रुपयांत खरेदी करण्यासाठी गृहिणी घरात बाहेर पडत होत्या. स्वस्तात मिळणाऱ्या कोबीची चवही रुचकर वाटत नसल्याची गृहिणींची प्रतिक्रिया गमतीदार वाटली.

हीच फुलकोबी 25 रुपये पाव अर्थात 100 रुपये किलो खरेदी करताना महागाईचा डोंब उसळल्याची महिलांची तक्रार ऐकावयास मिळते. आता मात्र, कोबी अतिशय स्वस्त दरात खरेदी करताना महिलांच्या चेहऱ्यावर खुशी असली तरी शेतकऱ्यांचा जीव तीळ तीळ तुटताना त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची लकेर दिसून येते.

सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता व जादा उत्पादनाची अपेक्षा असल्याने भाजीपाला लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. स्वाभाविकच उत्पादनवाढीमुळे बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. फुलकोबी सोबतच टोमॅटो पाच रुपये प्रतिकिलो, मेथीच्या पाच रुपयाला दोन जुड्या, सांभार दहा रुपये किलो, पालक पाच रुपयांच्या दोन जुड्या या कमी भावाचा बाजारपेठेतील हा उच्चांक आहे.

सध्या भाजीपाल्याचे उत्पादन भरपूर आहे. मोठ्या आवकमुळे सहाजिकच कोबी, टोमॅटोचे दर घसरले आहेत. हिवाळ्यात कमीभावाचा टप्पा येतोच. उन्हाळ्यात आवक घटली की भाव तेजीत येतात. तेजी-मंदीचा फायदा-फटका शेतकऱ्यांच्या अंगवळणी पडला आहे.
- शिवराम शेटे, 
भाजीपाला उत्पादक शेतकरी, निंबी (ता. पुसद)

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com