हिरव्या मिरच्यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी; भाव ७ हजारांवरून आला १५०० वर 

प्रदीप बहुरूपी
Wednesday, 25 November 2020

सप्टेंबर पासून सुरू होणारा राजुरा बाजार येथील हिरवी मिरचीचा बाजार नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात जोमात फुलतो. मिरची पिकासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याने मिरचीचे अधिक उत्पादन होते. अशावेळी चांगले बाजारभाव मिळावे अशी अपेक्षा असतांनाच आता मिरची गडगडली. 

वरुड (जि.अमरावती) :  सात हजार, पाच हजार, तीन हजार, दोन हजार अन्‌ आता पंधराशे रुपयांवर आलेल्या हिरव्या मिर्चीच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट आहे. बाजार फुलण्याच्या वेळीच भाव घसरल्याने तिखट मिरची फिकी पडल्याची भावना मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये दिसून येते.

सप्टेंबर पासून सुरू होणारा राजुरा बाजार येथील हिरवी मिरचीचा बाजार नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात जोमात फुलतो. मिरची पिकासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याने मिरचीचे अधिक उत्पादन होते. अशावेळी चांगले बाजारभाव मिळावे अशी अपेक्षा असतांनाच आता मिरची गडगडली. 

जाणून घ्या - युवकाला पडले रातोरात श्रीमंत झाल्याचे स्वप्न; सकाळी कोंबडा आरवताच केला आत्महत्येचा प्रयत्न 

सुरवातीला पाच साडेपाच हजारांपासून सुरुवात झालेले मिरचीचे बाजारभाव सात हजारापर्यंत पोचले उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने शेतकरी सुखावला असतानाच हिरव्या मिरचीचे भाव कमी होण्यास सुरुवात झाली. सातहजारी मिरची पाच, तीन, दोन व आता पंधराशेवर आली. हिरव्या मिरचीचे बाजारभाव गडगडल्याने शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाला आहे. मिरचीचा उच्चांकी बाजारभाव कायम राहील म्हणून शेतकऱ्यांनी महागडी कीटकनाशके, रासायनिक खते व मशागतीवर भर देत अधिकचा खर्च केला मात्र आता अल्प बाजारभाव शेतकऱ्यांच्या चिंतेचे कारण बनल्याचे दिसून येते.

आवक वाढली, भाव पडले

राजुरा बाजार येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हिरवी मिरची मार्केटमधून कोलकाता, दिल्ली, मुंबई या मोठ्या शहरांसह देशाच्या इतर ठिकाणीही मिरची पाठविली जाते. यावर्षी कोलकता व दिल्ली या ठिकाणी आतापर्यंत मिरची पाठविण्यात येत होती. त्या ठिकाणी मिरचीची आवक कमी असल्याने चांगले बाजारभाव मिळाले. परंतु आता तेथील बाजारात मिरचीची आवक वाढल्याने बाजारात मंदीचे सावट आहे. परिणामी त्या ठिकाणचेच बाजारभाव पडल्याने त्याचा परिणाम स्थानिक बाजारावर झाला असल्याचे सांगण्यात येते.

सविस्तर वाचा - शेतमजूर असलेल्या दिलीपची ही संपत्ती पाहून व्हाल थक्क; संग्रहात आहेत तब्बल ५० हजार अमूल्य वस्तू 

लोकल मार्केटवरच मदार

दिल्ली, कलकत्ता, मुंबई सारख्या मोठ्या मार्केटमध्ये जाणारी येथील मिरची बाजारभाव घसरल्याने नागपूर, अकोला, अमरावती, मध्यप्रदेशातील लगतच्या शहरांमध्ये पाठविली जात आहे. त्या ठिकाणी असलेले बाजारभाव कमी असल्याने त्याचा परिणाम या बाजारावर झाल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात येते.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rates of green chilly are fall down from 7 thousand to 1500 rupees