राऊत, केदारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नागपूर ः विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आज 51 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात जिल्ह्यातील सावनेर येथून सुनील केदार तर उत्तर नागपुरातून माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांना उमेदवारी देण्यात आली. जिल्ह्यातील इतर दहा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत मात्र पेंच कायम आहे. उत्तर नागपुरातून अनेकांनी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, डॉ. राऊत यांनी बाजी मारली.

नागपूर ः विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आज 51 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात जिल्ह्यातील सावनेर येथून सुनील केदार तर उत्तर नागपुरातून माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांना उमेदवारी देण्यात आली. जिल्ह्यातील इतर दहा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत मात्र पेंच कायम आहे. उत्तर नागपुरातून अनेकांनी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, डॉ. राऊत यांनी बाजी मारली.

कॉंग्रेसने घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील पहिली यादी जाहीर करीत 51 मतदारसंघांतील उमेदवारीबाबत विविध चर्चांना पूर्ण विराम दिला. नागपूर जिल्ह्यात 12 पैकी दोन मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर कॉंग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने शिक्कामोर्तब केले. माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यापुढे उत्तर नागपुरातून उमेदवारीसाठी अनेकांनी आव्हान उभे केले होते. परंतु, प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष तसेच राष्ट्रीय अनुसूचित जाती सेलचे ते अध्यक्ष असल्याने कॉंग्रेसमधील एक गट त्यांच्या उमेदवारीबाबत आश्‍वस्त होता. उत्तर नागपुरातून त्यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्या समर्थकांत उत्साह आहे. सावनेरमधून आमदार सुनील केदार यांच्यावर पुन्हा एकदा पक्षाने विश्‍वास दाखवला. सावनेर मतदारसंघात केदारांचे एकछत्र राज्य आहे. मागील 2014 मधील विधानसभा निवडणुकीत 12 जागांवरील उमेदवारांपैकी एकमेव सुनील केदार यांनी कॉंग्रेसची लाज राखली होती. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत सारेच निश्‍चित होते. त्यांची उमेदवारी जाहीर होताच, सावनेर मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. उमेदवारीसाठी उत्तर नागपुरात स्पर्धा वगैरे काहीही नव्हती, असे नमूद करीत डॉ. राऊत यांनी आता सर्वांनी मिळून काम करावे, असे आवाहन केले. दरम्यान, इतर दहा मतदारसंघातील कॉंग्रेसच्या इच्छुकांत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
शहर अध्यक्षांना प्रतीक्षा
डॉ. नितीन राऊत, सुनील केदार यांच्यासोबत शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांचीही उमेदवारी पहिल्याच यादीतून जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु पक्षाने त्यांना आणखी प्रतीक्षा करण्यास भाग पाडले. ठाकरे यांनी यापूर्वी पक्षाकडून दोनदा निवडणूक लढविली. पूर्व नागपुरात मागील निवडणुकीत ऍड. अभिजित वंजारी उमेदवार होते. दक्षिण नागपुरातून माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल यांच्या नावाची आहे. या दोघांनाही आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मतदारसंघात अनेक वर्षांपासून काम केले, आताही कार्यरत आहे. कॉंग्रेसमध्ये लोकशाही असल्याने प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. उमेदवारी मागणाऱ्यांचेही स्वागत करतो. आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन कॉंग्रेसला विजयी करण्यासाठी काम करावे.
- डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raut, Kedar's candidacy stamped