वाचनसंस्कृती कदापि लोप पावू शकत नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

नागपूर - दिवसेंदिवस सोशल मीडियाची उपयोगिता वाढत आहे. ऑनलाइन खरेदीकडे लोकांचा कल आहे. वर्तमानपत्रच नव्हे, तर मोठमोठ्या पुस्तकांचे वाचन ऑनलाइन केले जाते. सोशल मीडियावर त्यांची देवाणघेवाणही होते. परंतु, नागरिकांचे पुस्तकप्रेम आणि वाचनसंस्कृती कदापि लोप पाऊ शकत नाही, असे मत तरुणाईने सोशल मीडियावरील चर्चेत व्यक्‍त केले.

नागपूर - दिवसेंदिवस सोशल मीडियाची उपयोगिता वाढत आहे. ऑनलाइन खरेदीकडे लोकांचा कल आहे. वर्तमानपत्रच नव्हे, तर मोठमोठ्या पुस्तकांचे वाचन ऑनलाइन केले जाते. सोशल मीडियावर त्यांची देवाणघेवाणही होते. परंतु, नागरिकांचे पुस्तकप्रेम आणि वाचनसंस्कृती कदापि लोप पाऊ शकत नाही, असे मत तरुणाईने सोशल मीडियावरील चर्चेत व्यक्‍त केले.

जागतिक पुस्तकदिनाच्या निमित्ताने तरुणाईच्या एका व्हॉट्‌सॲप ग्रुपवर ‘सोशल मीडियाच्या आजच्या युगात वाचनसंस्कृती लोप पावत आहे का?’ या विषयावर चर्चा घेण्यात आली. त्यात तरुणाईने दिवसेंदिवस सोशल मीडिया कितीही ताकदवान होत असला, तरी आजही सकाळी घराघरांत वृत्तपत्रांची वाट त्याच आत्मीयतेने पाहिली जाते. केवळ ज्येष्ठ नागरिकच नव्हे, तर महिलांसह बच्चेकंपनीला वृत्तपत्राची प्रतीक्षा असते, असे दाव्यानिशी सांगितले.  

डिजिटलच्या वाढत्या युगामुळे वाचनसंस्कृती लोप पावत नसून ती वाढत आहे. कारण, आज बरीच दुर्मिळ पुस्तके ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्यामुळे वाचकांची भूक भागते. वाचकाला केवळ ऑनलाइन वाचून समाधान मिळत नाही, तर संबंधित पुस्तक आपल्याकडे संग्रही असावे, असेही वाटते. त्यामुळे वाचनसंस्कृती उत्तरोत्तर वाढतच जाणार, यात शंका नाही. 
- ओम सोनटक्‍के

ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली सकाळपासूनच विविध न्यूज चॅनेल्सवर बातम्यांचा रतीब सुरू असतो. तरी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र आल्यानंतर त्यातील बातमी वाचूनच खात्री केली जाते. हा रोजचा अनुभव आहे. त्यामुळे वाचनसंस्कृती लोप पावण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. 
- सचिन बोधे

आजही घरोघरी सामूहिक पारायण, ग्रामगीता वाचन तसेच इतरही धार्मिक ग्रंथांचे वाचन केले जाते. अनेक दुर्मिळ पुस्तके मिळविण्यासाठी बरेच जण धडपडत असतात. तरुणाईही नवलेखकांच्या प्रेमात पडत आहे. आजचा तरुण चौफेर विचार करणारा असल्याने वाचनाचे महत्त्व त्याला उमगले आहे.
- अश्‍विन रडके

घरातील कामांतून फुरसत मिळताच मी वर्तमानपत्र जवळ घेते. वर्तमानपत्रात एका विशिष्ट वर्गासाठी लिखाण केले जात नसून, त्यात बालकांपासून वृद्ध, महिला यांचाही विचार केला जातो. सोशल मीडिया कितीही प्रभावशाली होत असला, तरी वाचनाचे महत्त्व कमी झाले नाही आणि होणार नाही. कारण, ‘वाचाल तर वाचाल’ म्हटले आहे ते काही उगाच नव्हे.
- वैशाली घरजाळे

Web Title: Reading culture can never be eliminated