दक्षिण नागपुरातील बंडखोरी कायम

दक्षिण नागपुरातील बंडखोरी कायम

नागपूर : दक्षिण नागपूर विधानसभेचा अपवाद वगळता उर्वरित सर्वच मतदारसंघांतील बंडखोरांनी आज माघार घेतली. दक्षिणेतून शिवसेनेचे किशोर कुमेरिया, भाजपचे माजी उपमहापौर सतीश होले आणि कॉंग्रेसचे प्रमोद मानमोडे रिंगणात कायम असल्याने कॉंग्रेस आणि भाजपसमोरची डोकेदुखी कायम राहणार आहे. 
दक्षिण नागपूरमधून माजी उपमहापौर तसेच शिवसेना नागपूरचे अध्यक्ष किशोर कुमेरिया यांनी युतीधर्माचा त्याग करून बंड पुकारले आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली होती, तेव्हा माजी आमदार व भाजपचे उमेदवार मोहन मते यांनी बंडखोरी केली होती. याचा वचपा काढण्यासाठी ते ठाण मांडून बसले आहेत. याशिवाय माजी उपमहापौर व भाजपचे नगरसेवक सतीश होले यांनीसुद्धा माघार घेतली नाही. यामुळे मोहन मते यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे, याच मतदारसंघातून कॉंग्रेसचे प्रमोद मानमोडे यांनीही उमेदवारी मागितली होती. त्यांनीही उमेदवारी माघार घेण्यास नकार दिल्याने कॉंग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांना फटका बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. एकूणच शहरात दक्षिणेत सर्वाधिक चुरशीचा सामना होणार असल्याचे यावरून स्पष्ट होते. 
राऊत यांना दिलासा 
उत्तर नागपूरमधून कॉंग्रेसचे बंडखोर नगरसेवक मनोज सांगोळे यांना माघार घ्यायला लावण्यात नितीन राऊत यशस्वी झाले आहेत. त्यामुळे राऊत विरोधकांचेही खच्चीकरण झाले आहे. राऊत यांना उमेदवारी दिल्यास आपण बंडखोरी करू, असा इशारा सांगोळे यांनी आधीच दिला होता. याशिवाय उत्तरमधील पदाधिकाऱ्यांनीसुद्धा राजीनाम्याची धमकी दिली होती. येथील मतांचे समीकरण बघता राऊत यांना बेरजेचे राजकारण करणे अत्यंत गरजेचे आहे. 
रमेश पुणेकर यांचीही माघार 
मध्य नागपूरमधून नगरसेवक रमेश पुणेकर यांनी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. त्यांच्याऐवजी बंटी शेळके यांना उमेदवारी देण्यात आल्याने नाराज झालेले पुणेकर यांनी बंड केले होते. ते हलबा समाजाचे असल्याने भाजपचे उमेदवार विकास कुंभारे यांचीच अडचण वाढली होती. आता त्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. 
पांडे, पेठे माघारी परतले 
पूर्व नागपूरमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दुनेश्‍वर पेठे यांनीही बंड पुकारले होते. मात्र, त्यांचे बंड पेल्यातील वादळच ठरले. अवघ्या दोनच दिवसांत त्यांची नाराजी दूर झाली. नगरसेविका आभा पांडे यांनीही पूर्वमधून उमेदवारी दाखल केली होती. आमदार कृष्णा खोपडे यांच्याशी असलेले मतभेद बघता त्या रिंगणात कायम राहतील, अशी अपेक्षा वर्तविली जात होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com