यवतमाळच्या पाच मतदारसंघांत बंडखोरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

यवतमाळ : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकाही बंडखोराने उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे जिल्ह्यातील सातपैकी पाच मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. शिवसेनेच्या तीन व भाजपच्या दोन बंडखोरांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. भाजप, शिवसेनेची महायुती झाली असली तरी निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ, कनिष्ठ व स्थानिक नेत्यांना बंड शमविण्यात अपयश आले आहे. याचा परिणाम निवडणूक निकालावर होण्याची दाट शक्‍यता आहे.

यवतमाळ : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकाही बंडखोराने उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे जिल्ह्यातील सातपैकी पाच मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. शिवसेनेच्या तीन व भाजपच्या दोन बंडखोरांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. भाजप, शिवसेनेची महायुती झाली असली तरी निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ, कनिष्ठ व स्थानिक नेत्यांना बंड शमविण्यात अपयश आले आहे. याचा परिणाम निवडणूक निकालावर होण्याची दाट शक्‍यता आहे.
वेळेपर्यंत बंडोबांना थंड करण्यात येईल, असा विश्‍वास भाजप-शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांना होता. त्यासाठी "गल्ली ते दिल्ली'पर्यंत यंत्रणाही कामी लागली होती. बंडखोरांवर "प्रेशर' होते. मात्र, कुणालाही न जुमानता बंडखोरांनी आपले अर्ज कायम ठेवले. त्यामुळे निवडणुकीत रंगत निर्माण झाली असून, बंडखोरी थंड करू म्हणणारे नेतेच थंड झाल्याचे दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज सोमवारी (ता. सात) अखेरचा दिवस होता. त्यामुळे कोण माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजप-शिवसेना बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावे, यासाठी दोन दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई स्वत: यवतमाळात येऊन गेले. त्यांनी सर्व बंडखोरांशी संवाद साधला. तर, शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनीही बंड शमविण्याचे प्रयत्न केले. रविवार व सोमवार या दोन्ही दिवशी वेगवेगळ्या माध्यमातून बंडखोरांशी संपर्क साधण्यात आला. "कुठे बैठका, तर कुठे फोन' वरून समजूत घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र, बंडखोर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. परिणामी समजूत काढण्यासाठी आलेल्या नेत्यांना खाली हाताने मुंबई परतावे लागले. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ विधानसभेतील बंडखोर संतोष ढवळे यांची एका हॉटेलमध्ये भेट घेतली. दोघांत तब्बल दोन तास चर्चा झाली. चर्चेतून काय निर्णय होईल, याकडे शिवसैनिकांसह भाजपचे लक्ष लागले होते. मात्र, ढवळे यांनी माघार घेण्यास नकार दिला. दिग्रस विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार संजय देशमुख यांचा अर्ज कायम आहे. त्यामुळे संजय राठोड विरुद्ध संजय देशमुख अशी लढत होणार आहे. वणी विधानसभेत सर्वांत जास्त बंडखोर रिंगणात कायम आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख विश्‍वास नांदेकर यांनी अर्ज कायम ठेवला आहे. याशिवाय शिवसैनिक सुनील कातकडे रिंगणात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांचा अपक्ष अर्ज कायम आहे. संजय देरकर यांनीही उमेदवारी कायम ठेवल्याने सर्वाधिक रंगत वणी मतदारसंघात येणार आहे. आर्णी विधानसभेत भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांची उमेदवारी कायम असल्याने आता कॉंग्रेस-अपक्ष (भाजप बंडखोर), भाजप अशी लढत होणार आहे. उमरखेड मतदारसंघात शिवसेना पदाधिकारी डॉ. विश्‍वनाथ विनकरे यांचा अर्ज कायम आहे. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढतीचे चित्र दिसून येत आहे.

पुसद, राळेगावात थेट लढत
जिल्ह्यातील पाच मतदारसंघांना बंडखोरीचे ग्रहण लागलेले आहे. मात्र, राळेगाव व पुसद या दोन मतदारसंघांत बंडखोरी झालेली नाही. पुसदमध्ये दोन नाईक बंधूंमध्ये, तर राळेगावात दोन प्राध्यापकांमध्ये सरळ लढत होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rebellion in Yavatmal's five constituencies