डॉ. शाहूंच्या नियुक्तीचा पुनर्विचार करा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रभाश शाहू यांच्या शैक्षणिक अपात्रतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिकेवर निकाल देत न्यायमूर्ती झका हक यांनी शाहूंच्या नियुक्तीचा पुनर्विचार करण्याचे आदेश कुलगुरूंना दिले. 

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रभाश शाहू यांच्या शैक्षणिक अपात्रतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिकेवर निकाल देत न्यायमूर्ती झका हक यांनी शाहूंच्या नियुक्तीचा पुनर्विचार करण्याचे आदेश कुलगुरूंना दिले. 

डॉ. प्रियदर्शी मेघश्‍याम खोब्रागडे असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. विद्यापीठातर्फे सहयोगी प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली. यानुसार उमेदवारांनी अर्ज केला. यात डॉ. शाहू यांचा समावेश होता. याचिकाकर्त्याने केलेल्या दाव्यानुसार डॉ. शाहू यांनी सहयोगी प्राध्यापकपदासाठी आवश्‍यक असलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली नाही. तसेच सहयोगी प्राध्यापकपदाच्या उमेदवाराने विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मार्गदर्शन करणे आवश्‍यक आहे. मात्र, या प्रकारची आवश्‍यक पात्रता नसताना डॉ. शाहू यांची नियुक्ती केल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला. शाहू यांच्या नियुक्तीविरुद्ध याचिकाकर्त्याने पूर्वी कुलपतींकडे दाद मागितली होती. परंतु, कुलपतींनी याचिका निकाली काढत शाहू यांची नियुक्ती योग्य असल्याचा निर्णय दिला होता. त्याविरुद्ध खोब्रागडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. 

पहिल्यांदा प्रकरणावर द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी झाली. यानंतर द्विसदस्यीय खंडपीठाच्या आदेशानुसार एकल न्यायपीठासमक्ष सुनावणी झाली. यात याचिकाकर्त्याने मांडलेला मुद्दा ग्राह्य धरत शाहूंच्या नियुक्तीचा पुनर्विचार करण्याचे आदेश कुलगुरूंना दिले. याचिकाकर्त्यातर्फे ऍड. आर. व्ही. खापर्डे, कुलपतींतर्फे ऍड. अमित माडीवाले, विद्यापीठातर्फे ऍड. सुधीर पुराणिक तर शाहूंतर्फे ऍड. गौरी वेंकटरामन यांनी बाजू मांडली. 

Web Title: Reconsider the appointment of Shahu