या तरूण शेतकऱ्यांने घेतले धानाचे विक्रमी उत्पादन !

अर्जुनी मोरगाव ः कापगते यांनी लागवड केलेले धानपीक.
अर्जुनी मोरगाव ः कापगते यांनी लागवड केलेले धानपीक.

अर्जुनी मोरगाव(गोंदिया) :  पारंपरिक शेतीला बगल देत शेतकरी आता अधिक उत्पादन कसे घेता येईल, यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान अवगत करून यांत्रिक शेतीच्या माध्यमातून शेती करण्याकडे वळले आहेत. असाच एक प्रयोग तालुक्‍यातील निमगाव येथील शेतकरी राजू कापगते यांनी करून पाहिला व ते यशस्वीसुद्धा झाले. त्यांनीदोन एकर शेतात सिड्रील यंत्राने धानाची कमी खर्चात आवत्या पद्धतीने लागवड करून विक्रमी उत्पादन घेतले आहे.


शेती करण्याचे नवनवे फंडे
अर्जुनी मोरगाव तालुका धान उत्पादनाचे कोठार म्हणून विदर्भात परिचित आहे. तालुक्‍यात उद्योगधंद्याची वानवा असल्याने बहुतांश नागरिक शेतीकडे वळले आहेत. दरवर्षीचा शेतीचा वाढता खर्च व नापिकीमुळे दुष्काळात सदैव पिचलेला शेतकरी नवनवीन विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यांत्रिक उपयोग करून शेती करण्याचे नवनवे फंडे अवगत करीत आहेत.

त्यांच्याकडे पाच एकर शेती

निमगाव येथील राजू कापगते हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे. पाच एकर शेतीपैकी त्यांनी दोन एकरात आवत्या पद्धतीने कमी खर्चात जास्त उत्पादनाची धान शेती करण्याचा एक प्रयत्न केला व ते यशस्वी झाले. राजू कापगते यांनी वेळ आणि खर्चाची बचत व्हावी, म्हणून सिड्रील यंत्राच्या माध्यमातून एम. टी. यू 1001 या वाणाच्या धानाची लागवड केली. या लागवडीसाठी नांगरणी किंवा चिखल करून रोवणी करण्याचा खर्च वाचविण्यात आला. या लागवडीसाठी त्यांनी रासायनिक खत व कीटकनाशके याचा केवळ एकच वेळ वापर केला. लागवडीपासून तर धानाचे उत्पादन निघेपर्यंत आठ ते दहा हजार रुपये प्रतिएकर खर्च आल्याचे राजू कापगते यांनी सांगितले.


45 ते 50 हजार रुपये नफा
यांत्रिक पद्धतीने आवत्याची शेती केल्याने वेळ पैशाची बचत तर झालीच शिवाय दोन एकरात 36 ते 40 क्विंटल उत्पादन होईल. दोन एकर जागेत या पद्धतीने उत्पादन घेतले असता 65 ते 70 हजार रुपयांचे उत्पन्न होणार असून, खर्च वजा जाता 45 ते 50 हजार रुपये नफा मिळणार असल्याचेही राजू कापगते यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com