वसुली निरीक्षक बनले व्यवस्थापक

केवल जीवनतारे
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

नागपूर : चर्मकार समाजातील व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने, तसेच त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (मर्यादित) स्थापन करण्यात आले. मात्र, मनुष्यबळाअभावी महामंडळाच्या नागपूर विभागातील पाचही जिल्ह्यांचा कार्यभार प्रभारीवर असून, कुठे वसुली निरीक्षक तर कुठे लेखापाल यांनाच "जिल्हा व्यवस्थापक' असे लेबल लावल्याची माहिती पुढे आली.

नागपूर : चर्मकार समाजातील व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने, तसेच त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (मर्यादित) स्थापन करण्यात आले. मात्र, मनुष्यबळाअभावी महामंडळाच्या नागपूर विभागातील पाचही जिल्ह्यांचा कार्यभार प्रभारीवर असून, कुठे वसुली निरीक्षक तर कुठे लेखापाल यांनाच "जिल्हा व्यवस्थापक' असे लेबल लावल्याची माहिती पुढे आली.
चर्मकार समाजातील चर्मकार, ढोर, होलार, मोची आदी समाजाच्या उत्थानाचे धोरण राबविण्यासाठी सरकारने 1 मे 1974 रोजी कंपनी कायद्याअंतर्गत महाराष्ट्र चर्मोद्योग विकास महामंडळ स्थापन केले. यानंतर 2 जानेवारीला 2003 च्या शासन निर्णयानुसार या महामंडळाचे "संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, मर्यादित' असे नवीन नामकरण करण्यात आले. या समाजातील जाती व त्यांच्या पोटजाती असलेल्या चांभार, ढोर, होलार, मोची यांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास करुन त्यांना दारिद्रय रेषेच्यावर आणण्याचा प्रयत्न या महामंडळातर्फे करण्यात येतो. राज्यात चर्मोद्योग विकास करणे, चर्मोद्योगातील कारागिरांचा विकास करणे, चर्मोद्योगातील तंत्रज्ञान विकसित करणे, चर्मवस्तूंसाठी बाजारपेठेची निर्मिती, राज्यातील चर्मोद्योग विकासासाठी चालना देणे तसेच शिक्षित युवकांसाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबविण्यासाठी विभागीय पातळीवर तसेच जिल्हा पातळीवर कार्यालय थाटण्यात आले. पूर्व विदर्भात भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यात चर्मोद्योग महामंडळाची जिल्हा कार्यालये असून सर्व कार्यालयातील जिल्हा व्यवस्थापक प्रभारी म्हणून काम करीत आहेत. नागपूर जिल्हा कार्यालयात शैलेंद्र पुणेकर हे वसुली निरीक्षक आहेत. मात्र, त्यांच्याकडे जिल्हा व्यवस्थापकांचा अतिरिक्त भार दिला आहे. हीच स्थिती गोंदियात आहे. अरुण महाजन गोंदियात तर विजयालक्ष्मी भगत चंद्रपूरमध्ये प्रभारी जिल्हा व्यवस्थापक म्हणून काम बघत आहेत. वर्ध्यात रमाकांत पांडे तर भंडारा येथे कल्पना बंगाडे आणि गडचिरोलीत एस. एन. ढगे प्रभारी जिल्हा व्यवस्थापक आहे. नागपूर विभागात सारेच जिल्हा व्यवस्थापक प्रभारावर आहेत. नागपूर जिल्ह्यात पाऊणेदोन लाखावर चर्मकार समाजाची संख्या आहे. मात्र, त्यांच्या विकासाचे धोरण राबविणाऱ्या महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अवघे 3 जण काम करतात. जिल्हा व्यवस्थापक, वसुली निरीक्षक आणि लेखापाल. शासनाच्या या उदासीन धोरणामुळेच चर्मोद्योग महामंडळाला घरघर लागली आहे.  
विभागीय अधिकारीही प्रभारावर
महामंडळाच्या नागपूरसह पाच जिल्ह्यांचा कार्यभार सांभाळण्यासाठी विभागीय अधिकारी नेमण्यात येतो. चर्मोद्योग पादत्राण उत्पादन, चर्मोद्योग चर्मवस्तू उत्पादनाचा विशेष कार्यक्रम राबविण्याचे धोरण ते ठरवतात. परंतु, नागपूरचे विभागीय अधिकारी संजय काथवटे असून तेदेखील प्रभारावर असल्याची माहिती पुढे आली आहे.

Web Title: The recovery manager became the revenue manager