पदभरतीची जाहिरात काढतात; मुलाखतीचे काय?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

अकोला - राज्यातील विद्यापीठामंध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीपदाच्या भरतीसाठी जाहिरात काढली जाते. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविल्यानंतर पुढे मुलाखती होतात किंवा नाही, याबाबत उमेदवारांना माहितीच दिली जात नाही. यातून विद्यापीठ स्तरावरील पदभरतीबाबत गांभीर्यच राखले जात नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे राज्यपालांनीच यात लक्ष देऊन पदभरतीच्या जाहिरातीतच मुलाखतीपर्यंतच्या वेळापत्रकाचा उल्लेख असणे बंधनकारक करणे गरजेचे आहे.

अकोला - राज्यातील विद्यापीठामंध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीपदाच्या भरतीसाठी जाहिरात काढली जाते. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविल्यानंतर पुढे मुलाखती होतात किंवा नाही, याबाबत उमेदवारांना माहितीच दिली जात नाही. यातून विद्यापीठ स्तरावरील पदभरतीबाबत गांभीर्यच राखले जात नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे राज्यपालांनीच यात लक्ष देऊन पदभरतीच्या जाहिरातीतच मुलाखतीपर्यंतच्या वेळापत्रकाचा उल्लेख असणे बंधनकारक करणे गरजेचे आहे.

राज्यातील कृषित्तर विद्यापीठांतर्फे प्राध्यापक, प्रोफेसर आणि शिक्षकेतर पदांची भरतीप्रक्रिया वेळोवेळी राबविली जाते. प्राध्यापक, प्रोफेसर पदांसाठी सरासरी 40 ते 50 उमेदवार अर्ज करतात. यात बहुतांशवेळा विदेशातील उमेदवारांचाही समावेश असतो. शिक्षकेतरपदांसाठी तर सरासरी हजार उमेदवार अर्ज करतात. या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करताना त्यात पदभरतीच्या संपूर्ण वेळापत्रकाचा समावेशच नसतो. उमेदवारांनी जाहिरातीनुसार, अर्ज करताना दस्तऐवजाचे नऊ बंच सादर करणे आवश्‍यक आहे. सोबतच हजार रुपयांपर्यंत शुल्कही आकारले जाते. एकदा अर्ज मागविल्यानंतर अर्ज करणाऱ्यांना मुलाखती कधी होतील, याची प्रतीक्षाच करावी लागते. बहुतांश वेळ पदभरती रद्द झालेली असतानाही उमेदवारांना ते कळविण्याची तसदी विद्यापीठ प्रशासनाकडून घेतली जात नाही. हा उमेदवारांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे राज्यपालांनीच पदभरतीकडे लक्ष देऊन जाहिरातीमध्ये पदभरतीचे मुलाखतीपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक देणे बंधनकारक करावे, तसेच पदभरती रद्द झाली असेल, तर उमेदवारांना कळविण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी नामनिर्देशित सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

मुलाखती न झालेल्या पदभरती
अलीकडच्या काळात काही विद्यापीठांनी पदभरतीसाठी जाहिरात काढून अर्ज मागविले होते. मात्र, मुलाखती झाल्या किंवा नाही याबाबत कुठलीही नोंद नाही किंवा त्याचे कोणतेही कारण विद्यापीठातर्फे देण्यात आले नाही. शिक्षकेतरपदासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने 29 जून 2013 रोजी जाहिरात काढून अर्ज मागविले. मात्र, मुलाखतीच घेतल्या नाहीत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकची मार्च 2016 ची जाहिरात आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने डिसेंबर 2015 मध्ये काढलेली जाहिरात बघून अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अद्याप मुलाखतीच घेण्यात आल्या नाहीत. असेच प्रकार राज्यातील इतर विद्यापीठांतही घडत असल्याचे दिसून येते.

अंतर्गत राजकारणात पदभरतीचा खोळंबा
विद्यापीठ स्तरावर मोठ्याप्रमाणावर अंतर्गत राजकारण चालते. या राजकारणात अनेक वेळा पदभरतीचा खोळंबा होतो. गटातटाच्या राजकारणामुळे अर्ज मागवूनही मुलाखतीच होऊ दिल्या जात नसल्याचे चित्र अलीकडच्या काही घटनांवरून दिसून येते. परिणामी पदभरती रद्द होऊन पदे रिक्त राहतात.

विद्यापीठाने जाहिरात काढल्यानंतर आर्थिक कुवत नसतानाही अनेक उमेदवार गुणवत्तेच्या आधारावर मोठ्या आशेने अर्ज करतात. त्यासाठी आर्थिक भुर्दंडही सहन केला जातो. मात्र, त्यानंतर मुलाखतीच होत नाही. हा त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार विद्यापीठांनी थांबवायला हवा. त्यासाठी राज्यपालांनी हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.
-डॉ. संजय खडक्कार, माजी नामनिर्देशित सदस्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.

Web Title: Recruitment advertising