रुग्ण दगावल्यानंतर पदे भरणार? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

नागपूर - जिल्ह्यातील आदिवासीबहुल व दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्त आहेत. त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला; मात्र परिणाम झाला नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणा रुग्ण दगावल्यानंतर रिक्त पदे भरणार का, असा संप्तत सवाल जिल्हा परिषद सदस्यांनी पदाधिकाऱ्यांना केला. 

जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा आज (ता. 1) उपाध्यक्ष शरद डोणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सुरुवातीलाच सदस्यांनी ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये वर्षभरापासून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून, ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे केंद्र केवळ नाममात्र ठरत आहे. परिणामी ग्रामीण जनतेला खासगी रुग्णालयातून उपचार घ्यावे लागतात. अद्याप आरोग्य प्रशासनाला पाझर फुटला नाही. ही रिक्त पदे केव्हा भरणार व जनतेची होणारी गैरसोय केव्हा टाळणार, असा मुद्दा सदस्यांनी लावून धरला. रिक्त पदे त्वरित भरावी, यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे डोणेकर यांनी सांगितले. पारशिवनी तालुक्‍यातील साठक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या आमली वऱ्हाडा येथील आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली आहे. तिथे अत्याधुनिक इमारत लवकरच उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. 

पल्स पोलिओ अभियान 

जिल्ह्यात 19 जानेवारीपासून पल्स पोलिओ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याच्या मोहिमेला सुरुवात होईल. ही मोहीम ग्रामीण भागात यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील 49 प्राथमिक आरोंग्य केंद्रे व 316 उपकेंद्रांमध्ये अंगणवाडीसेविका, शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे डोणेकर यांनी सांगितले. 

Web Title: recruitment in zp hospital