रेडक्रॉसने भेदले वारांगनांचे दृष्टचक्र

केवल जीवनतारे
बुधवार, 8 मे 2019

‘रेडक्रॉस’चा इतिहास
युद्धातील जखमींवरील उपचारासाठी स्विस व्यापारी हेन्‍री ड्यूना यांनी ९ फेब्रुवारी १८६३ रोजी ‘कमिटी ऑफ फाइव्ह’ ही आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्था तयार केली. पुढे या संस्थेचे विकसित रूप २२ ऑगस्ट १८६४ रोजी ‘रेडक्रॉस’ या नावाने पुढे आले. रेडक्रॉस या संस्थेची शाखा भारतामध्ये २७ मार्च १९२९ रोजी स्थापन झाली. शिधापत्रिका, आधार कार्ड काढण्यापासून तर मेट्रो वर्कर्स, एमआयडीसीतील कंपनी कामगारांना प्रथमोपचाराचे धडे देण्याचे काम अविरत सुरू आहे. आग, अपघात अशा आपत्तीसमयी धावून जाण्यासाठी रेडक्रॉसचे प्रतिनिधी नेहमीच पुढे असतात.

नागपूर - देहविक्रीच्या काळोख्या गुहेकडे जाणारे रस्ते अनेक आहेत, पण यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग नाही. या भोवऱ्यात एकदा अडकले की आपल्याला बाहेर पडायचे आहे, या जाणिवेचा मृत्यू होतो. याउपरही प्रयत्नातून असे काही घडले तरी हा समाज स्वीकारत नाही. मात्र, यावर मात करण्यात ‘रेडक्रॉस’ला यश आले असून वर्षभरात आठ वारांगनांना हे दुष्टचक्र भेदून बाहेर पडण्यासाठी मदत केली आहे. वारांगनांचं जगणं बदलण्याचा पॅटर्न यशस्वी झाल्याने त्यांच्या आयुष्यातील दिशा उजळल्या आहेत.

पोटाची भूक भागवण्यासाठी चेहऱ्याला रंग फासून त्या शरीर विकतात. त्यांचे आयुष्य म्हणजे यातनांची यात्राच असते. देह विकताना होणाऱ्या वेदनांची जाणीव संपली असते. या महिलांना मदतीचा हात देत त्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी आशेचा किरण फुलवणारी लाल रंगातील ‘अधिक’ चिन्ह ओळख असलेली ‘रेडक्रॉस’ संस्था. 

पंचवीस वर्षांपासून इंडियन रेडक्रॉस सोसायटी जुन्या मंगळवारी परिसरात वारांगनांचे आयुष्य बदलण्यासाठी तसेच त्यांना आरोग्याच्या सोयीसवलती उपलब्ध करून देण्यासाठी काम करीत आहे. वारांगनांमध्ये शरीर स्वच्छता, आरोग्यासह एचआयव्हीबाबत जनजागृतीची जाणीव करून देते. या संस्थेतील कार्यकर्त्यांचा काफिला एकमेकांशी माणुसकीचे नाते जपत काम करतो. 

या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. सचिव म्हणून प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आर. पी. सिंग यांच्यासह सहसचिव अरुप मुखर्जी, डॉ. शिवकुमार चव्हाण, ॲड. सुधीर धुर्वे, डॉ. मनोज मानकर, डॉ. टी. डी. मेंढेकर नागपूरचे काम सांभाळत आहेत. ८ मे रोजी जागतिक रेडक्रॉस दिन साजरा होत आहे. उपराजधीनीतील रेडक्रॉसच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी प्रशिक्षक हेमलता लोहवे यांच्याशी साधलेल्या संवादातून वारांगनांच्या जगण्याचे पॅटर्नच बदलण्यात यश आल्याचे पुढे आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Redcross Organisation Birdth Anniversary