धार्मिक स्थळावरील कारवाईला विरोध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

नागपूर - उच्च न्यायालयाच्या आदेशाने महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात सुरू केलेल्या कारवाईला आज गड्डीगोदाम परिसरात विरोध झाला. येथील दुर्गा मंदिर हटविण्यावरून स्थानिक लोकांनी विरोध केला. अधिकारी, पोलिसांविरोधात नागरिकांनी नारेबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतल्यानंतर मंदिर हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. 

नागपूर - उच्च न्यायालयाच्या आदेशाने महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात सुरू केलेल्या कारवाईला आज गड्डीगोदाम परिसरात विरोध झाला. येथील दुर्गा मंदिर हटविण्यावरून स्थानिक लोकांनी विरोध केला. अधिकारी, पोलिसांविरोधात नागरिकांनी नारेबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतल्यानंतर मंदिर हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. 

गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेने रस्ते, फूटपाथवरील अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात कारवाई सुरू केली आहे. आज महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने आशीनगर, मंगळवारी आणि लक्ष्मीनगर झोनमध्ये कारवाई केली. मात्र, मंगळवारी झोनमधील गड्डीगोदाम येथील लिंक रोडवरील महावितरणच्या कार्यालयालगत दुर्गा मंदिर हटविताना नागरिकांनी विरोध केला. नागरिकांनी अधिकाऱ्यांशी वाद घालत दुर्गा मंदिर तोडण्याचे आदेश दाखवा, कोर्टाचे आदेश दाखवा, अशी मागणी केली. या वेळी अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचारी तसेच पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोध कायम असल्याने येथे तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर दुर्गा मंदिरातील मूर्ती पूजा करून बाहेर काढण्यात आली. शेवटी मंदिराचा ढाचा तोडण्यात आला. याशिवाय याच मंदिराच्या बाजूला असलेले हनुमान मंदिरातूनही पूजा केल्यानंतर मूर्ती काढली व ढाचा भुईसपाट केला.

मंगळवारी झोनमध्ये राजनगरमध्ये रस्त्याच्या बाजूला असलेले हनुमान मंदिर, मेकोसाबाग उड्डाणपुलाखालील मशीद, पीडब्ल्यूडी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील हनुमान मंदिर तोडण्यात आले. आशीनगर झोनमध्ये मॉडेल टाऊन येथील नागोबा मंदिर, बाळाभाऊ पेठेतील हनुमान मंदिर, माता चौकातील माता मंदिर, नवा नकाशा येथील महादेव मंदिर, लक्ष्मीनगर झोनमधील गजानननगर, सुभाषनगर टी पॉइंट, जयताळा रोडवरील मंदिरावरही बुलडोझरच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली.

तीन दिवसांत ३८ मंदिर, मशिदीवर कारवाई 
शुक्रवारपासून महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईत आतापर्यंत ३८ मंदिरे, मशिदीवर कारवाई करीत रस्ते, फूटपाथ मोकळे करण्यात आले. शुक्रवारी १५, शनिवारी १२ तर आज ११ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली.

Web Title: religious place crime oppose high court