अधिकाऱ्यांच्या यादीवर भरोसा नाय, ग्रामस्थांचा गदारोळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

कुही (जि.नागपूर) ः परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त पिकांचा केलेले सर्वेक्षण चुकीचे असून अधिका-यांनी केलेले सर्वेक्षण पानटपरीवर बसून केले असल्याचा आरोप ग्रामसभेतील शेतकाऱ्यांनी केले व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. 

कुही (जि.नागपूर) ः तालुक्‍यातील उमरेड कऱ्हांडला अभयारण्यालगत अतिदुर्गम भागात असलेल्या चिकणा गटग्रामपंचायतीच्या रविवारी झालेल्या ग्रामसभेत पीक नुकसानाच्या चुकीच्या सर्वेक्षणावरून गदारोळ उठला. ग्रामसभेत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. 

नुकसान झालेल्यांचा नावाच्या यादीला कात्री 
ज्यांच्या शेतात पऱ्हाटी उभ्या अवस्थेत आहे त्यांचे नाव अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्तांच्या यादीत लिहिले. याचा अर्थ सर्वेक्षण हे कोणत्या तरी पानठेल्यावर बसून केलेले दिसून येते. त्यामुळे ज्यांचे खरोखर नुकसान झाले त्यांची नावेच यादीत नाहीत. म्हणून नव्याने यादी तयार करुन पात्र शेतकऱ्यांची नावे पिकांच्या उल्लेखासह माहिती आजच्या ग्रामसभेतून जाऊ द्या, अशी आग्रही मागणी ग्रामसभेत उपसरपंच तुळशीदास कळंबे यांनी केली. 

या ग्रामसभेचे नोडल अधिकारी तथा पंचायत समिती कुहीच्या कृषी अधिकाऱ्यांनी सरपंच, उपसरपंच, सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष व शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर कुणीही पात्र लाभार्थी हा नुकसानभरपाईपासून वंचित राहू नये, असा शासनाचा हेतू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. म्हणून रविवार सुटीचा दिवस असूनसुद्धा तातडीची ग्रामसभा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही सांगितले. 

अधिका-यांनी घेतले नमते 
ग्रामसभेच्या मागणीनुसार सुटलेल्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी तयार करून ग्रामसभेच्या शिफारशींसह तसा अहवाल पाठविण्यात येईल, असे नोडल अधिकारी बा. अ. चव्हाण यांनी ग्रामसभेला समजावून सांगितले. तेव्हा कुठे सर्वांचे समाधान झाले. सभेत मंडळ अधिकारी अरुण रामटेके म्हणाले की, शासनाचा आदेश व निकषांप्रमाणे सर्वेक्षण झाले असून सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळायलाच हवा, अशी प्रामाणिक इच्छा असल्याचे सांगितले. सर्व शेतकऱ्यांचे समाधान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपापली नावे नव्या यादीत नोंदवून घेतली.
 
यावेळी ग्रामसभेला सरपंच बापूराव मोटघरे, उपसरपंच तुळशीदास कळंबे, कृषी अधिकारी चव्हाण, मंडळ अधिकारी अरुण रामटेके, ग्रामसचिव लिंगायत, ग्रामपंचायत सदस्य रेखा जुमडे, रजनी पडोळे, प्रिया पाटील, अनिता बावणे, नागोराव मांढरे, धम्मकीर्ती मेश्राम, तंटामुक्तीचे अध्यक्ष केशव चव्हाण, पोलिस पाटील सूर्यकांता चव्हाण, मुकेश शेंडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relying on the list of officers, the villagers swarmed