जीर्ण इमारतींची दुरुस्ती करा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

नागपूर : जीर्ण घरांची तज्ज्ञ इंजिनिअरकडून तपासणी करून घेत योग्य दुरुस्ती करण्याचे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले. महापालिका आवश्‍यक ती परवानगी देण्यास तयार असून, विविध उपाययोजनांसाठीही तयार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. जीर्ण इमारतीत अपघात झाल्यास त्यास घरमालक जबाबदारी राहतील, असेही महापालिकेने स्पष्ट केले.

नागपूर : जीर्ण घरांची तज्ज्ञ इंजिनिअरकडून तपासणी करून घेत योग्य दुरुस्ती करण्याचे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले. महापालिका आवश्‍यक ती परवानगी देण्यास तयार असून, विविध उपाययोजनांसाठीही तयार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. जीर्ण इमारतीत अपघात झाल्यास त्यास घरमालक जबाबदारी राहतील, असेही महापालिकेने स्पष्ट केले.
शहरात साडेतीन हजारांवर जीर्ण इमारती आहेत. यातील नागरिक धोक्‍यात असल्याबाबत "सकाळ'ने आज 2 ऑगस्ट रोजी ठळकपणे वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत महापालिका प्रशासनाने आज जीर्ण घराबाबत आपली भूमिका स्पष्ट करीत नागरिकांना इमारतीची तज्ज्ञ इंजिनिअरकडून पाहणी करण्याचा सल्ला दिला. वेळोवेळी तपासणी करून आपली इमारत सुरक्षित राखण्याची जबाबदारी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार प्रत्येक घरमालकाची आहे, असे मनपाने सुनावले. शहरातील एखादी इमारत किंवा तिचा काही भाग, छप्परकाम, जीना आदी भाग धोक्‍याचा असल्याचे आढळल्यास त्याबाबतची लेखी माहिती घरमालकाची प्रतीक्षा न करता परिसरातील नागरिकांनी झोनल कार्यालयात द्यावी, असे आवाहनही मनपाने केले. महापालिकेने काही धोकादायक इमारतीची तज्ज्ञ स्ट्रक्‍चरल इंजिनिअरकडून तपासणी करून घेतली. तज्ज्ञांच्या अहवालामध्ये "धोकादायक व राहण्यास अयोग्य' असे नमूद केलेल्या इमारत मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी घरे त्वरित खाली करणे आवश्‍यक आहे. इमारत रिकामी करण्यापूर्वी त्यातील भाडेकरू किंवा सदनिकाधारक यांच्या ताब्यात असलेले चटईक्षेत्र मोजून त्याप्रमाणे त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यासाठी नागरिकांनी झोनमधील सहायक आयुक्तांसोबत संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. जीर्ण घरांची पाहणी करून धोका नाहीसा करण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना करण्यात येत असल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले. नोटीस दिल्यानंतरही जे नागरिक धोकादायक घरात राहात असतील अन्‌ भविष्यात काही अपघात झाल्यास महापालिका जबाबदारी घेणार नाही, असेही या अधिकाऱ्याने नमूद केले. दुरुस्तीसाठी नागरिकांनी प्रस्ताव दिल्यास प्रशासन परवानगी देईल, असेही मनपाने स्पष्ट केले. याशिवाय महापालिकेकडून नागरिकांचे मार्गदर्शनही केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Repair old buildings