महामार्ग ते लोहारा रस्ता त्वरित दुरुस्त करा अन्यथा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

अकोला - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 पासून लोहारा गावापर्यंतच्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा अन्यथा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे लागतील. असा इशारा शिवसंग्रामने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

राष्ट्रीय महामार्ग ते लोहारा गावापर्यंतचा रस्ता हा तालुक्याला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. या एका रस्त्यावर मांडोली, कोळासा, मानारखेड, कसुरा, सोनगिरी, कळंबी, महागाव, कळंब बु., कळंब खु., डोंगरगाव, लोहारा इत्यादी गावे आहेत. महाजनकोच्या जड वाहनांमुळे या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यांवर एवढे खड्डे पडलेत की त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविणे फक्त कठीणच झाले नाही तर धोकादायक सुद्धा झालेले आहे. अपघातांचे प्रमाण वाढल्याने या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेकडे आहे. पण ही यंत्रणा या रस्त्याकडे अजिबात लक्ष देत नाही. 

या रस्त्यावरील गावांमधील नागरिकांचा त्रास लक्षात घेऊन शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीपदादा पाटील यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन त्यांना रस्त्याच्या दुरावस्थेची माहिती देऊन लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीची मागणी केली. रस्त्याची अवस्था आणखी धोकादायक होऊन परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यास  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे लागतील असा शिवसंग्रामचा पवित्रा संदीपदादा पाटील यांनी निवेदनातून स्पष्ट केला आहे. निवेदन देताना अक्षय झटाले पाटील, निखिल बोरीकर, पंकज खंडारे, शुभम ढोरे पाटील, पंकज घोगरे पाटील, संतोष खरोडे, अजय पाटील यांचेसह शिवसंग्रामचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: repair the road from the highway to the Lohara road or we will file case on officals