esakal | भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर, वाचा कोणत्या जागा कोणासाठी राखीव
sakal

बोलून बातमी शोधा

reservations for bhandara zilla parishad election

मार्चमध्ये काढलेल्या सोडतीनंतर काही विद्यमान सदस्यांना फटका बसला होता. त्यामुळे नव्या ठिकाणासाठी त्यांच्याकडून चाचपणी सुरू होती. त्यामुळे काहींना मोक्‍याचे ठिकाण मिळाले होते तर, काहींना पत्नीला समोर करावे लागणार होते.

भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर, वाचा कोणत्या जागा कोणासाठी राखीव

sakal_logo
By
दीपक फुलबांधे

भंडारा : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 13 मार्चला आरक्षण सोडत काढण्यात आली होती. मात्र, तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य विनायक बुरडे यांनी ओबीसी आरक्षणाबाबत निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदविला होता. त्याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने नव्याने सोडत काढण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी नव्याने आरक्षण सोडत काढली. यामुळे अनेक दिग्गजांच्या जागा महिलांसाठी राखीव असल्याने नाराजी पाहायला मिळत आहे. 

मार्चमध्ये काढलेल्या सोडतीनंतर काही विद्यमान सदस्यांना फटका बसला होता. त्यामुळे नव्या ठिकाणासाठी त्यांच्याकडून चाचपणी सुरू होती. त्यामुळे काहींना मोक्‍याचे ठिकाण मिळाले होते तर, काहींना पत्नीला समोर करावे लागणार होते. दरम्यान, राजकीय पक्षांचे नेते आपल्या पक्षासाठी नवीन चेहरे शोधत असताना सोमवारच्या सोडतीमुळे समिकरणे पुन्हा बदलली आहेत. त्यावेळी आनंदी झालेले आता दु:खी चेहऱ्याने बाहेर पडताना दिसून आले.

हेही वाचा - खुशखबर! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १८ हजार कोटींची मदत

माजी सभापती विनायक बुरडे यांचे क्षेत्र महिलांसाठी राखीव झाल्यामुळे त्यांनी मुरमाडी-तुपकर येथून लढण्याची तयारी केली होती. सोमवारच्या सोडतीत पालांदूर हे त्यांचे स्वक्षेत्र सर्वसाधारण झाल्यामुळे त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी सभापती नरेश डहारे आणि माजी सभापती धनेंद्र तुरकर यांच्यासाठी ही सोडत लाभदायक ठरली आहे. यात यशवंत सोनकुसरे आणि देवचंद ठाकरे यांना स्वतः निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे. तसेच माजी सभापती प्रेमदास वनवे आणि जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर दुरूगकर यांना आरक्षणाचा फटका बसला आहे. आता त्यांना नवीन क्षेत्राचा शोध घ्यावा लागणार आहे.

हेही वाचा - अरे हे काय, पाहुण्या पक्ष्यांच्या आगमनाला यंदा होणार...

जुने आरक्षण जैसे थे - 
अनुसूचित जाती सर्वसाधारण गटात आष्टी, खमारी-बुटी, भागडी या क्षेत्राचा समावेश आहे. अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षणात परसोडी, वडद, आसगाव, सरांडी, मोहरणा, पोहरा या क्षेत्राचा समावेश आहे. अनुसूचित जमाती सर्वसाधारण गटात सानगडी, पिंपळगाव-कोहळी तर, अनुसूचित जमाती महिलांसाठी पहेला, किन्ही-एकोडी या क्षेत्राचा समावेश आहे.

हेही वाचा - पदवीधरांच्या निवडणुकीत शिक्षक परिषदेचाही स्वबळाचा नारा

नवे चित्र असे असणार -
सर्वसाधारण गटात चिखला, बपेरा, येरली, देव्हाडी, पालांदूर, आंधळगाव, धारगाव, गणेशपूर, कोंढा, सावरला, मासळ, चुल्हाड, डोंगरगाव या क्षेत्राचा समावेश आहे. नामाप्र सर्वसाधारण गटात भुयार, सिहोरा, गर्रा, वरठी, लाखोरी, मुरमाडी-सावरी, सिल्ली, महिला सर्वसाधारण आरक्षणात ठाणा, खोकरला, करडी, दिघोरी, आमगाव, पिंडकेपार, बेटाळा, कोथुर्णा, कुंभली, सावरी-जवाहरनगर, आंबागड, पिंपळगाव-सडक, नामाप्र महिला गटात केसलवाडा-वाघ, ब्रह्मी, मुरमाडी-तुपकर, कांद्री, खापा, पाचगाव, अड्याळ या क्षेत्रांचा समावेश आहे.
अस्तित्वाची प्रतिष्ठेची निवडणूक -
जिल्हा परिषदेची ही निवडणूक सत्तापक्षासाठी अस्तित्वाची आणि विरोधी पक्षासाठी प्रतिष्ठेची राहणार आहे. या निवडणुकीत उमेदवारीसाठी अनेकांची भाऊगर्दी होणार असून अनेकांनी मोर्चेबांधणी केली आहे. परंतु, पक्षश्रेष्ठी निवडून येण्याची शक्यता असलेल्याच कार्यकर्त्याला उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे.  तरी, एकाच जागेसाठी अनेक दावेदार समोर येत असल्याने उमेदवारी देताना नेत्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. 

loading image