मेस्मामुळे निवासी डॉक्‍टर भयभीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नागपूर ः राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्‍टरांनी सामूहिक रजा आंदोलन (संप) पुकारले. संपावर जाण्यापासून रोखण्यासाठी सरकारने महाराष्ट्र अत्यावश्‍यक सेवा कायद्याचा (मेस्मा) डोस पहिल्याच दिवशी दिला. यामुळे भयभीत झालेल्या निवासी डॉक्‍टरांनी संप मागे घेतला. तर सरकारने या निवासी डॉक्‍टरांना पुन्हा 31 ऑगस्टपर्यंत विद्यावेतनवाढीसंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असादेखील डोस दिला. यामुळे तूर्तास संपाला विराम दिला आहे.
निवासी डॉक्‍टरांच्या सर्व मागण्यांवर विचार करण्यात येईल. क्षयरुग्णांवर उपचार करताना दरवर्षी 3 रुग्णांना क्षय होत असल्याची माहिती पुढे आली. यामुळे क्षयासारख्या आजारावर उपचारासाठी रजा मंजूर कराव्यात. तसेच जोखीम भत्ता लागू करावा, महिला निवासी डॉक्‍टरांना प्रसूती रजा मंजूर करण्यासोबतच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला विरोध करण्यासाठी राज्यातील निवासी डॉक्‍टरांनी संपाचे हत्यार उपसले. परंतु, राज्य सरकारने तत्काळ निवासी डॉक्‍टरांनी संप मागे न घेतल्यास "मेस्मा' लावण्याचा निर्णय घेतला आणि संबंधित अधिष्ठातांनी मध्यरात्री 12 नंतर पोलिसांत तक्रार करीत या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात मार्ड प्रतिनिधींनाही कळविण्यात आले. यामुळे राज्यातील चार हजारांवर असलेल्या निवासी डॉक्‍टरांमध्ये मेस्माचे भय पसरले. राज्यभरात मध्यरात्रीनंतर 1 ते 2 वाजतादरम्यान संप मागे घेण्यात येत असल्याची घोषणा केली. केवळ एक दिवसाचा संप असल्यामुळे 24 तासांचे पैसे निवासी डॉक्‍टरांच्या वेतनातून कपात होणार की नाही, याबाबत मात्र वैद्यकीय संचालक कार्यालयातून अद्याप आदेश जारी झाले नाही.
निवासी डॉक्‍टर "हाजीर हो...'
निवासी डॉक्‍टरांच्या कामाचे तास, विविध अडचणींवर सरकार कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, हे आश्‍वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधनमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. तसेच संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनीही मध्यस्थी केली. अखेर राज्यासहित नागपुरातील मेडिकल आणि मेयोतील सर्व निवासी डॉक्‍टरांनी "हाजीर हो...'चा नारा जारी केला. शुक्रवारी सकाळी आठला मेडिकलमधील 540 तसेच मेयोतील 210 निवासी डॉक्‍टर कर्तव्यावर हजर झाले. शासनाने 31 ऑगष्टपर्यंत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात येतील, असे लेखी दिल्याने 31 ऑगस्टपर्यंत संप मागे घेण्यात आला आहे. जर आश्‍वासन पाळले नाही, तर मात्र मेस्माला प्रत्युत्तर देत पुन्हा सामूहिक रजा आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा मार्डतर्फे देण्यात आला आहे, असे नागपूर मार्डचे अध्यक्ष डॉ. मुकुल देशपांडे म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Resident doctor terrified by Mesma