Shripad-Joshi
Shripad-Joshi

राजीनाम्याची प्रेरणा राज ठाकरेंपासून

नागपूर - ‘एका सामान्य कार्यकर्त्याने दिलेल्या धमकीचे समाजावर किती वाईट परिणाम होऊ शकतात, याची जाणीव ठेवत त्याच्या चुका पोटात घालणारा माफीनामा राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केला. महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यामागे राज ठाकरे यांच्या या कृतीचीच प्रेरणा आहे,’ अशी प्रतिक्रिया डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. 

‘पक्ष प्रमुखाने कसे वागायचे असते, याचा आदर्श राज ठाकरे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून घालून दिला आहे. आम्हीही आयोजकांच्या अडचणी समजून घेतल्या. पण, आता हिटलर, मुसोलिनी असे संबोधत माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू होता. पण, घडलेल्या  प्रकाराची जबाबदारी कुणीही घेत नव्हते. त्यामुळे मला ती जबाबदारी स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. पण, माझे चारित्र्यहनन करण्यामागे कुणाची प्रेरणा आहे, याचा शोध संमेलनाच्या समारोपानंतर नक्की घेणार,’ असेही डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले. ‘संमेलन हा आपला अग्रक्रम  होता आणि आता अध्यक्ष नसतानादेखील संमेलनाला जाणार आहे. पण, त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे नयनतारा सहगल यांची डेहराडूनला जाऊन माफी मागणे होय. थंडी कमी झाली की डेहराडूनला जाऊन समस्त मराठी माणसांच्या वतीने मी नयनतारा सहगल यांची माफी मागणार आहे,’ असे डॉ. जोशी यांनी सांगितले. 

अश्रूंचा बांध फुटला
गेल्या आठ दिवसांपासून आरोपीच्या कठड्यात असलेले डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आपल्या अस्वस्थतेला खास मित्रांकडे अश्रूंद्वारे वाट मोकळी करून दिली. या संपूर्ण घडामोडींचा कुटुंबाच्या मनावर होत असलेला परिणाम अधिक अस्वस्थ करीत असल्याने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, असेही ते या मित्रांकडे बोलल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते.

मुख्यमंत्र्यांच्या नावाचा अपप्रचार
‘मुख्यमंत्री नागपूरचे आणि जोशीही नागपूरचे म्हणून दोघांनी मिळून नयनतारा सहगल यांचे  निमंत्रण रद्द केले, असा अपप्रचार करण्यात आला. सहगल कोणत्या विचारसरणीच्या आहेत याच्याशी महामंडळाला काहीही घेणेदेणे नव्हते. पण, त्यांच्या भाषणाच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांच्या दिशेने बोट दाखविण्याचे कारस्थान रचण्यात आले. यापूर्वी श्रीपाल सबनीस आणि लक्ष्मीकांत देशमुख यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरून आपले  मुद्दे प्रभावीपणे मांडले होते. त्यांचे तोंड मुख्यमंत्र्यांनी दाबून ठेवले नाही, तर इथे प्रश्‍नच उद्‌भवत नव्हता,’ ही बाब डॉ. जोशी यांनी स्पष्ट केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com