सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल अडकले फेक जाहिरातीच्या जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

खात्यात आणखी पैसे टाकण्यास सांगितले. पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी फोन बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

हिंगणा (जि. नागपूर) :  सुरक्षा दलातून लेफ्टनंट कर्नल या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याला फेक जाहिरातीवर भरवसा ठेउन गुंतवणूक करणे चांगलेच महागात पडले. सेवानिवृत्तीनंतर मिळालेला पैशांची गुंतवणूक करून  होम शॉपी आणि ई-होम शॉपी कंपनीची डिस्ट्रिब्युटरशिप  घेताना त्यांची फसवणूक झाली अन हे प्रकरण पोलिसात पोहचले . 

शहरातील एका सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल अधिकाऱ्याला होम शॉपी कंपनीचा वितरक नियुक्‍त करण्याच्या नावाखाली जवळपास दोन लाख रुपयांनी गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी तीन आरोपींना मध्यप्रदेशातून अटक केली आहे. आरोपींना 18 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दुर्गेश जयनारायण गजरे (वय 30, रा. लसुडीया, इंदोर), सुरेंद्र जगन्नाथ व्यास (वय 35, रा. शिवाजी नगर, लसोडीया) व लवकुश सखाराम सोलंकी (वय 29, रा. खंडवा रोड, इंदोर) अशी आरोपींची नावे आहेत. 

हेही वाचा : वाघ आले रे आला... रात्रीचे ओलित कसे 

कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सांगितले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रमोहन लालचंद्र रंधीर (वय 75, रा. रामनगर, अंबाझरी) हे सुरक्षा दलातून लेफ्टनंट कर्नल या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडे सेवानिवृत्तीनंतर काही पैसा मिळाला होता. त्यांना पैशांची गुंतवणूक करायची होती. त्यांनी एका नामांकित राष्ट्रीय टीव्ही चॅनेलवर एक जाहिरात बघितली. ही जाहिरात होम शॉपी आणि ई-होम शॉपी कंपनीची डिस्ट्रिब्युटरशिप देण्याबाबत होती. त्यावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर रंधीर यांनी संपर्क केला. मास्टरमाइंड दुर्गेश गजरे याने रंधीर यांना काही दिवसांतच वितरण प्रणालीच्या साखळीत जोडून घेण्याबाबत आदेश जिे. त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सांगितले. 

पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी फोन बंद

त्यामुळे रंधीर यांचा विश्‍बसला. सुरुवातीला कंपनीमध्ये डिपॉझिट म्हणून 1 लाख 40 हजार रुपये अमानत म्हणून ठेवण्यास सांगितले. वेगवेगळ्या कामांसाठी आणि कंपनीचे प्रॉडक्‍ट पाठविण्याच्या नावाखाली आरोपींनी लवकुश सोलंकी याच्या खात्यात आणखी पैसे टाकण्यास सांगितले. पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी फोन बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ठाणेदार प्रदीप रायन्नवार यांच्या पथकातील महिला पोलिस उपनिरीक्षक कविता कोकणे यांच्याकडे तपास दिला. परराज्यातून झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणाचा त्यांनी छडा लावला. ही कारवाई पीएसआय कविता कोकणे, पोलिस हवालदार गैभीनाथ, अमोल आणि शुभांगी यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired colonel stuck in a trap