12 वर्षांच्या तपानंतर अखेर निवृत्तीचा प्रवास 

केवल जीवनतारे
गुरुवार, 12 जुलै 2018

नागपूर - 12 वर्षांपूर्वी मेडिकलमध्ये बीएससी नर्सिंग कॉलेज सुरू झाले. बीएससी नर्सिंग कॉलेजची मान्यता कायम ठेवण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने सेवाज्येष्ठतेनुसार प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक अशी खाऊसारखी पदे वितरित केली. आज नाही तर उद्या पदस्थापना होईल. प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदावर कायमस्वरूपी संधी मिळेल, या आशेवर इमाने-इतबारे शिक्षणधर्म निभावत राहिले. 12 वर्षांचे तप पूर्ण केल्यानंतरही संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या ट्यूटर्सची पदस्थापना झाली नाही आणि डझनभर ट्यूटर्स अखेर निवृत्त झाले.

नागपूर - 12 वर्षांपूर्वी मेडिकलमध्ये बीएससी नर्सिंग कॉलेज सुरू झाले. बीएससी नर्सिंग कॉलेजची मान्यता कायम ठेवण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने सेवाज्येष्ठतेनुसार प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक अशी खाऊसारखी पदे वितरित केली. आज नाही तर उद्या पदस्थापना होईल. प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदावर कायमस्वरूपी संधी मिळेल, या आशेवर इमाने-इतबारे शिक्षणधर्म निभावत राहिले. 12 वर्षांचे तप पूर्ण केल्यानंतरही संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या ट्यूटर्सची पदस्थापना झाली नाही आणि डझनभर ट्यूटर्स अखेर निवृत्त झाले. त्यांच्या हातावर वाटाण्याच्या अक्षता ठेवण्याचे काम या विभागाने केले. विशेष असे की, आमदारांपासून तर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतरही पदस्थापना करण्यात आली नसून आता सारे ट्यूटर्स अज्ञातवासात जाणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) जीएनएमचा दर्जा वाढवून बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम 2006 साली सुरू केला. त्यावेळी पदनिर्मितीचा प्रश्‍न उभा ठाकला. बीएससी नर्सिंगला शिकवण्यासाठी शैक्षणिक पात्रता असलेल्या ट्यूटर्सला संधी मिळाली. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने अकलेचे तारे तोडत मध्यम मार्ग काढला. सेवाज्येष्ठतेनुसार प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक अशी तात्पुरते पदे निर्माण करीत प्रभारावर काम करण्याची ट्यूटर्सला संधी दिली. या संधीचे सोने साऱ्या ट्यूटर्सनी केले. शिकवण्याचे समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी बीएससी नर्सिंगच्या विषयावर जणू मौनव्रत पाळले. 12 वर्षांत आलेल्या 11 सचिवांनी पदनिर्मितीच्या आश्‍वासनांची खैरात वाटली. अतिरिक्त मोबदला न घेता सारे ट्यूटर परिचारिका घडविण्याचे काम करीत राहिले. ट्यूटर म्हणून नियुक्त झाले आणि ट्यूटर म्हणूनच निवृत्त होण्याची वेळ शासनाने आणली. यामुळे सचिव, संचालक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रॅज्युएट ट्रेन्ड नर्सेस असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. 

निवृत्त झालेले ट्यूटर 
बीएससी नर्सिंग कॉलेजमध्ये प्राचार्यपदापासून तर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पद मिळेल या आशेवर आशा शिमगेकर, श्रीमती देवधर, रेझिना डायस, अनिता परदेसी, स्वाती कांबळी, श्रीमती मिस्त्री, प्रीती वैद्य, श्रीमती आकुट, अडसूळ, पाटील यांच्यासहित राज्यातील औरंगाबाद, पुणे आणि मुंबईतील ट्यूटर्स लाभाशिवाय निवृत्त झाले आहेत. 

आज बैठक 
बीएससी नर्सिंग, कॅन्सर इन्स्टिट्यूट तसेच मेयो आणि मेडिकलच्या समस्यांवर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, सचिव तसेच संचालक यांची संयुक्त बैठक मेयो रुग्णालयात आयोजित करण्यात आली आहे. 

Web Title: retirement stay after 12 years