धान भरडाई प्रकरण विधिमंडळात गाजणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

देसाईगंज (जि. गडचिरोली) : धान भरडाईत गैरव्यवहार चव्हाट्यावर आल्याने हे प्रकरण आता विधिमंडळात गाजण्याची शक्‍यता असून यासंदर्भात विरोधकांनी शासनाकडे तक्रार केली आहे.

देसाईगंज (जि. गडचिरोली) : धान भरडाईत गैरव्यवहार चव्हाट्यावर आल्याने हे प्रकरण आता विधिमंडळात गाजण्याची शक्‍यता असून यासंदर्भात विरोधकांनी शासनाकडे तक्रार केली आहे.
देसाईगंज येथील नैनपूर मार्गावर असलेल्या तिरुपती राइसमिलमध्ये व तिरुपती राइस इंडस्ट्रीज तसेच सिरोंचा तालुक्‍यातील रामानुजपूर येथील नारायण ऍग्रो इंडस्ट्रीज यांना खरीप हंगाम 2016-17 व 2018-19 मध्ये आदिवासी विकास महामंडळ गडचिरोलीने दिलेल्या धान भरडाईत अनियमितता आढळून आली. त्यामुळे तीनही राइसमिल काळ्या यादीत टाकण्यात आले होते. तत्पश्‍चातही राइसमिलर्सना संबंधित विभागाकडून धान भरडाईचे डीओ देण्यात आल्याने या संपूर्ण प्रकरणाबाबतचा अहवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी राज्याच्या प्रधान सचिवांना मागितला आहे.
तिरुपती राइसमिल व तिरुपती राइस इंडस्ट्रीज तसेच सिरोंचा तालुक्‍यातील रामानुजपूर येथील नारायण ऍग्रो इंडस्ट्रीज या मिलला 2016-17 व 2018-19 मध्ये आदिवासी विकास महामंडळ गडचिरोलीतर्फे धान भरडाईचे काम देण्यात आले होते. दरम्यान या राइसमिलच्या संचालकांनी शासनाशी केलेल्या करारनाम्याच्या अटी व शर्थीचे भंग करून निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवठा केला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी 12 फेब्रुवारी 2019 ला प्रकरणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते.
राईसमिलस संबंधित विभागाकडून धान भरडाईच्या कामाबाबत आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पत्रानुसार संबंधित राइसमिलस संचालकांवर केलेली कारवाई व त्यानंतर आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून 20 फेब्रुवारी 2019 च्या पत्रकानुसार केलेली कारवाई अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिवांना मागितली आहे.

तांदळाची अफरातफर
विशेष म्हणजे, देसाईगंज येथील तिरुपती राइसमिल व तिरुपती राइस इंडस्ट्रीजमध्ये गेल्या महिन्यात आदिवासी विकास महामंडळाच्या तांदळाची अफरातफर केली जात असल्याची गंभीर बाब उघडकीस आली. देसाईगंजचे तहसीलदार डी. टी. सोनवाणे यांनी आदिवासी विद्यार्थी सेनेचे सरसेनापती नंदू नरोटे यांनी केलेल्या तक्रारीवरून राइसमिलमध्ये छापा मारून चौकशी केली. लक्ष्मी राइसमिल शिवणीच्या नावाने आदिवासी विकास महामंडळाचा शिक्का असलेल्या बारदान्यात तांदूळ भरताना रंगेहाथ पकडले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rice grinding case will be played in the Legislative Assembly