
जिल्ह्यातील राइस मिल्स संकटात सापडले असून, सर्वसाधारण नागरिकांना नवीन तांदळाच्या चवीसाठी याचना करावी लागत आहे.
भंडारा : गेल्या दोन वर्षांपासून हमीभाव खरेदी केंद्रात धानाला चांगला भाव मिळत असल्याने बहुतेक शेतकऱ्यांचा भरडाई न करता धानविक्रीचा कल आहे. यामुळे जिल्ह्यातील गावागावात सुरू असलेल्या राइस मिलर्सला शोधूनही ग्राहक मिळेनासे झाले आहे. तसेच आपली गुंतवणूक करून धान, तांदळाची खरेदी करून परजिल्ह्यात विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवरही आर्थिक संकट कोसळले आहे. यामुळे जिल्ह्यातील राइस मिल्स संकटात सापडले असून, सर्वसाधारण नागरिकांना नवीन तांदळाच्या चवीसाठी याचना करावी लागत आहे.
हेही वाचा - परीक्षेसाठी थांबली मंगलाष्टके, पेपर संपताच नववधू चढली बोहल्यावर
झाडीपट्टीतील पर्जन्यमानानुसार पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत धानाचे मुख्य पीक घेतले जाते. त्यामुळे या भागात राइस मिल्स उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. भंडारा जिल्ह्यात लहानमोठे 350 राइस मिल गावोगावी आहेत. खरिपाचे पीक आल्यापासून राइस मिलर्सचा चार महिने हंगाम सुरू होतो. ठोकळ, बारीक, सुगंधी अशा विविध प्रजातीच्या तांदळासाठी या भागात वेगवेगळ्या जिल्ह्यातून व परराज्यातून मागणी होते. वेळप्रसंगी रेल्वेनेसुद्धा तांदळाचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांचा माल बाजारात आल्यापासून उन्हाळ्यापर्यंत धान व तांदळाच्या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली जाते. या खरेदी-विक्रीचा स्वयंरोजगार करणारे तरुण, व्यापारी, अडत्या सर्वांसाठी हंगाम महत्वाचा ठरत होता. सर्वाधिक तांदूळ विक्री होत असल्याने तुमसर शहराला तांदळाचे कोठार म्हणतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या परिस्थितीत मोठा बदल झाला आहे.
हेही वाचा - कोरोनात वाचविले, अनलॉकमध्ये गमावले; अपघातात तब्बल २८९...
चांगल्या भावामुळे परिस्थिती बदलली -
मागील वर्षापासून हमीभावासह राज्य सरकारकडून 700 रुपये बोनस दिला जात आहे. त्यामुळे धानाची प्रतिक्विंटल किंमत 2500 रुपयांपर्यंत गेली आहे. त्यामुळे खुल्या बाजारात व बाजार समितीमध्ये तांदळाला मिळणारा भाव हमीभाव खरेदी केंद्रात धानाला मिळत आहे. त्यामुळे लहानमोठ्या सर्वच शेतकऱ्यांचा कल खरेदीकेंद्रात धानाची विक्री करण्याचा आहे. यामुळे कोणताही शेतकरी धान भरडाईसाठी राइस मिलमध्ये जात नाही. यामुळे कोट्यवधीचे कर्ज घेऊन आधुनिक यंत्र बसविणाऱ्यांना व्याजही मिळेनासे झाले आहे. मिलींग झाल्याबरोबर तांदळाची जात व दर्जापाहून मागणी करणारे व्यवसाय ठप्प झाले आहेत. गुंतवणूक करून परजिल्ह्यात तांदूळ विक्री करणाऱ्यांना गुंतवलेली मुद्दल काढणे कठीण झाले आहे. गेल्या वर्षी मार्केटींग फेडरेशनकडून सर्वाधिक 32 लाख क्विंटल धानखरेदी करण्यात आली होती. यावर्षीही 25 लाख क्विंटल धानखरेदी करण्यात येईल, असा अंदाज आहे.
हेही वाचा - मृत्यू जवळ येताना दिसताच 'त्यांनी' घेतला महत्वाचा निर्णय; प्रेरणादायी काम करून मिळवलं...
नव्या तांदळाची चव विसरली -
खरिपातील नवीन धान व तांदूळ बाजारात येताच त्यापासून पोहे, मुरमुरे, चिवडी तयारी करून गावोगावी विकणारे लहान व्यावसायिक हल्ली दिसेनासे झाले आहेत. तसेच नवीन तांदळापासून घरोघरी बनविले जाणारे साधे पदार्थ भरून तयार केलेले गुंजे आणि नवीन तांदळाचा शिजवताना येणारा सुगंध सर्वकाही मिळेनासे झाले आहे. शेतकऱ्यांचा चांगला भाव मिळतो, ही समाधानाची बाब आहे. मात्र, त्यामुळे जिल्हावासीयांच्या तोंडची चव पळालेली आहे.