या रस्त्यानी दम्याचा धोका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

- उड्डाणपुलासह रस्त्यांच्या कामाने धूळ
- नागरिकांना ॲलर्जी अन् दम्याचा धोका
- नियोजनशून्य विकास कामांचा आरोग्याला भूर्दंड

अकोला : शहरभर उड्डाणपुलासह रस्त्यांची कामे सुरू असल्याने नागरिकांना आता धुळीचा धोका निर्माण झाला आहे. थोडीशी हवा आणि वाहने जाताच धूळ उडून अंगाला खाज, सर्दी आणि चक्क दम्याला निमंत्रण देऊ शकते. मागील काही दिवसांपासून धुळीचे प्रमाण चांगलेच वाढले असून ज्येष्ठ नागरिक, बालक आणि रुग्णांना त्यांचा सर्वाधिक धोका असल्याचे तज्ज्ञ सांगतात. 

निरोगी आयुष्यासाठी दररोज सकाळी नागरिक विविध मार्गावर मार्निंग वॉकसाठी बाहेर पडतातत. मात्र शहरातील बसस्थानक, रेल्वेस्टेशन, अशोक वाटिका मार्गावर उड्ढाणपुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे दिवसभर या मार्गावर मोठ्याप्रमाणात धूळ असते. या धुळीमुळे अंगाला खाज, सर्दी, डोळ्यांचे आजार यासह चक्क दम्यान निमंत्रण मिळत असल्याचे दिसून येत आहे. पण याकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे पहायला मिळत आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांप्रमाणे 50 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांप्रमाणे 100 मायक्रोग्रॅम प्रती घनमीटरपेक्षा अधिक धूलिकण आरोग्यास धोकादायक आहेत. पण शहरात या धूलिकणाचे प्रमाण क्षमतेपेक्षा तिप्पट आढळून येत आहे.

दम्याचा धोका
धुळीसोबत मातीतील जंतू नाकातोंडात जाऊन डोळ्यांत जळजळ, घसा दुखणे, नाक वाहने, खोकला, हृदयविकार, छातीदुखी असा त्रास जाणवतो. याच्या सातत्याच्या सहवासाने दमा संभवतो. धूलिकण विशिष्ट उंचीच्या खालीच तरंगत असल्याने 0 ते 6 वयोगटातील चिमुकल्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक धोकादायक असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

हे करावे उपाय
धुळीच्या ठिकाणी वाहनांची गती कमी ठेवणे.
नियमित अंतराने रस्ते स्वच्छ करणे
धुळीवर पाणी फवारणे

वाढते धुळीचे प्रमाण हे धोकादायक ठरणारे आहे. त्यामुळे दम्यांच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. अशावेळी तोंडाला रुमाल बांधून बाहेर पडावे. नागरिकांनी यासंदर्भातील काळजीही घेणे महत्वाचे आहे.
डॉ. आशिष सालकर, दमारोग तज्ज्ञ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the risk of asthma on this road