"आरएमएस' कार्यालयातून "नो एन्ट्री'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जुलै 2016

नागपूर - "टीम सकाळ‘ने स्टिंग ऑपरेशनद्वारे रेल्वेस्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल केली. यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक दक्षतेने कामाला लागली आहे. रेल्वे मेल सर्व्हिसेसच्या कार्यालयाचे गेट प्रवाशांसाठी पूर्णत: बंद करण्यात आले आहे. प्रवाशांकडील लगेजचे कटाक्षाने स्कॅनिंग केले जात आहे.

नागपूर - "टीम सकाळ‘ने स्टिंग ऑपरेशनद्वारे रेल्वेस्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल केली. यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक दक्षतेने कामाला लागली आहे. रेल्वे मेल सर्व्हिसेसच्या कार्यालयाचे गेट प्रवाशांसाठी पूर्णत: बंद करण्यात आले आहे. प्रवाशांकडील लगेजचे कटाक्षाने स्कॅनिंग केले जात आहे.

"सकाळ‘च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये रेल्वेस्थानकावर तब्बल 11 "इल्लिगल एन्ट्रीज‘ आढळून आल्या. या मार्गांनी देशविघातक आणि असामाजिक तत्त्वांना बिनरोखटोक रेल्वेस्थानकावर पोहोचता येत असल्याची बाब "सकाळ‘ने वृत्तमालिकेतून मांडताच रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली. इल्लिगल एन्ट्रीज टप्प्या-टप्प्याने बंद करण्याची ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली. सुरक्षेच्या ऑडिटसाठी तीन सदस्यीय समितीचेही गठण करण्यात आले. वृत्तमालिकेनंतर रेल्वेस्थानक आणि दोन्ही एन्डला असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

अनधिकृत प्रवाशांसाठी आरएमएस कार्यालय हा सर्वात सोईस्कर मार्ग होता. मात्र, आता हा मार्ग प्रवाशांसाठी पूर्णत: बंद करण्यात आला आहे. केवळ पार्सल नेणे किंवा आणण्यासाठीच शटर उघडण्यात येते. एकदा हातगाडी येताच पुन्हा गेट बंद केले जाते. यादरम्यान प्रवासी जाताना दिसल्यास आरएमएस कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून त्यांना मनाई करण्यात येते.

पश्‍चिम आणि पूर्व भागात प्रत्येकी एकच स्कॅनिंग मशीन आहे. प्रवाशांनी लगेचचे स्कॅनिंग करून घेणे अपेक्षित आहे. मात्र, त्याकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात येत होते. पण, आता सुरक्षा रक्षकांकडून कटाक्षाने प्रत्येक प्रवाशाला लगेजचे स्कॅनिंग करून घेण्यास सांगण्यात येते.

सीसीटीव्हीच्या मुद्द्यावर मौन
सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी आठवडाभरात निविदा काढण्याची घोषणा सुरक्षा यंत्रणेतील अधिकाऱ्याने केली होती. या घोषणेला 12 दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप निविदा काढण्यात आल्या नाहीत. या विषयावर कुणी बोलायलाही तयार नाही. यावरून प्रवासी आणि रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेबाबत सुरक्षा यंत्रणा किती दक्ष आहे, ते स्पष्ट होते.

Web Title: "RMS" office "No Entry"