रस्ते बांधकामालाही नक्षलवाद्यांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

गडचिरोली - जिल्ह्यात रविवार (ता.2) पासून नक्षलवाद्यांचा "पीएलजीए' सप्ताह सुरू झाला आहे. एटापल्ली तालुक्‍यात सापडलेल्या नक्षलपत्रकात गावातील रस्ते बांधकामाचाही विरोध केला आहे. दोनच दिवसांपूर्वी एटापल्लीतील वटेपल्ली-गटेपल्ली रस्त्याच्या कामावरील 16 वाहने नक्षलवाद्यांनी जाळून टाकली. यात कंत्राटदाराचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. नक्षलवाद्यांच्या सप्ताहामुळे दुर्गम भागातील वाहतूक सेवा प्रभावित झाली आहे.

नक्षलवादी दर वर्षी दोन ते आठ डिसेंबरदरम्यान पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीचा स्थापना सप्ताह साजरा करतात. या सप्ताहादरम्यान ते विध्वंसक कारवाया करतात. या वेळी सप्ताहापूर्वीच त्यांनी 16 वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी टाकून आपली दहशत निर्माण केली आहे.

अलीकडेच जहाल नक्षली नंबाला केशव राव ऊर्फ गगन्ना यास नक्षल्यांनी माओवादी कम्युनिस्ट पार्टीचा महासचिव बनविले आहे.

गगन्ना हा नक्षल्यांचा मिलिटरी कमांडर असल्याने हिंसाचारावर त्याचा अधिक भर आहे. त्याच्या नियुक्तीनंतर विध्वंसक कारवाया मोठ्या प्रमाणावर होतील, असा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला होता. हा अंदाज गडचिरोलीत खरा ठरला. आर्थिक अडचणीत सापडलेल्या नक्षल संघटनेने पुन्हा एकदा रस्ते कंत्राटदाराला टार्गेट केले. हालेवारा पोलिस ठाण्यापासून आठ किलोमीटर अंतरावर वाहने जाळपोळीची घटना घडल्याने सुरक्षा यंत्रणेपुढे आव्हान उभे ठाकले आहे.

नक्षल सप्ताहादरम्यान सापडलेल्या पत्रकात नक्षलवाद्यांनी मुख्य रस्त्यासोबतच गावातील विकासकामांनाही विरोध केला आहे. जहाल माओवादी पहाडसिंग याने गेल्या ऑगस्ट महिन्यात पोलिसांपुढे शरणागती पत्करली होती. यावर नक्षल संघटनेने नाराजी व्यक्त केली. धोका केल्याचा आरोप त्याच्यावर केला आहे. त्याने महत्त्वाचे दस्तावेज व दारूगोळ्याची माहितीसुद्धा पोलिसांना दिल्याचे छत्तीसगड-मध्य प्रदेश, महाराष्ट्र स्पेशल झोनल कमिटीने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Road Binding Naxalite Oppose