येथे खडीचा नाही पत्ता अन खड्ड्यांची नाही गिनती..नागरिक करताहेत जीवघेणा प्रवास..

roads and national highways are in bad condition in Yavatmal
roads and national highways are in bad condition in Yavatmal

यवतमाळ : दळवळणाच्या दृष्टीने राज्य महागार्म, जिल्हाप्रमुख मार्ग, खेड्यापाड्यांकडील रस्ते हे श्‍वास म्हणून ओळखले जातात. मात्र, हे कागदोपत्री आहे की काय, असाच प्रश्‍न आता निर्माण होत आहे. नव्याने तयार झालेले काही मोजके रस्तेवगळता जिल्ह्यातील इतर रस्त्यांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पुन्हा पुन्हा दुरुस्ती करायची, लाखो रुपयांची बिले काढायची, त्यानंतरही रस्त्याची अवस्था सुधारलेली नाही. जिल्ह्यातील प्रमुख रस्ते पावसात उखडले आहेत. त्यावर करण्यात आलेली डागडुजी निघाल्याने रस्त्याची स्थिती आणखी वाईट झाली आहे. अनेक ठिकाणी खडी दिसत नसून, खड्यांची संख्याही वाढली आहे.

जिल्हा मुख्यालयाला जोडणारे दोन-तीन रस्त्यांचे भाग्य उजळले आहे. सिमेंटचा रस्ता झाल्याने त्या मार्गावरील नागरिकांना दळणवळणासाठी चांगली सुविधा मिळाली आहे. मात्र, अजूनही अनेक भागांतील रस्ते दुरुस्त झालेले नाहीत. जिल्हा मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग यासोबत ग्रामीण रस्त्यांची अवस्था तर अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. दारव्हा-यवतमाळ मार्गाची अनेक ठिकाणी दुरावस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आलेत. मात्र, काही दिवसांत खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. 

पुन्हा निर्माण होतात खड्डे 

खड्ड्यात भरलेले साहित्य रस्त्यावर आल्याने मोठी पंचाईत झाली आहे. वाहनधारकांना खड्ड्यांपेक्षा बाहेर आलेल्या "चुरी'च अधिक धोकादायक ठरण्याची शक्‍यता आहे. कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी खड्डे भरण्यावर केली जाते. प्रत्यक्षात काही दिवसांत रस्त्यांची स्थिती "जैसे थे' होते. त्यामुळे झालेला खर्च काही दिवसांसाठी असल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करुनही रस्त्यांची स्थिती जैसे थे 

सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग द्विवार्षिक देखभाल दुरुस्तीचे कंत्राट देत आहे. मात्र, त्यांचाही फारसा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे जबाबदारी फिक्‍स करण्यासाठी ही पद्धत आणण्यात आली असली तरी दुसरीकडे पळवाटाही आहेत. परिणामी, कोट्यवधी रुपये खर्च करुनही रस्त्यांची स्थिती सुधारलेली नाही. ग्रामीण भागातील रस्त्यावर ना खडीकरण करण्यात आले, ना खड्डे भरण्यात आलेत. त्यामुळे खड्डे उघडेच आहेत. अनेक मार्गांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना नियमीत अंतर पार करण्यासाठी ठरावीक वेळेपेक्षा जास्त वेळ लागत आहे. दारव्हा-यवतमाळ मार्गाचे काम होणार असले तरी काही ठिकाणी रस्ता मोठ्या प्रमाणात उखडले आहेत. रात्रीच्या अंधारात खड्डे दिसत नसल्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत.

वाहने पंक्‍चर झाल्याने वाढली डोकेदुखी

रस्त्यावर आलेल्या गिट्टीमुळे अनेक वाहने पंक्‍चर होत आहेत. लॉकडाउनमुळे पाचनंतर संचारबंदी असल्याने दुकाने बंद होत आहेत. अशास्थितीत वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी, रस्तादुरुस्ती तत्काळ करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com