पेट्रोलपंपावर दरोडा, चौकीदाराची हत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

नागपूर - तोंडाला कापड बांधून आलेल्या पाच ते सहा दरोडेखोरांनी चौकीदाराची हत्या करीत साडेबारा लाखांची रोख असलेली तिजोरीच पळवून नेली. सीसीटीव्हीचे फुटेज असलेले डीव्हीआरही दरोडेखोर सोबत घेऊन गेले. नंदनवन हद्दीतील गुरुदेवनगरात रविवारी मध्यरात्रीनंतर घडलेली ही थरारक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

नागपूर - तोंडाला कापड बांधून आलेल्या पाच ते सहा दरोडेखोरांनी चौकीदाराची हत्या करीत साडेबारा लाखांची रोख असलेली तिजोरीच पळवून नेली. सीसीटीव्हीचे फुटेज असलेले डीव्हीआरही दरोडेखोर सोबत घेऊन गेले. नंदनवन हद्दीतील गुरुदेवनगरात रविवारी मध्यरात्रीनंतर घडलेली ही थरारक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

नूर खाँ (७५) रा. हसनबाग असे मृताचे नावे आहे. गुरुदेवनगर येथील मंगलमूर्ती लॉन  चौकालगत असलेल्या पंचशील ऑटोमोबाईल या पेट्रोलपंपावर ते अनेक वर्षांपासून चौकीदारी करीत होते. आत्मरक्षणासाठी रात्री ते कुऱ्हाड सोबत ठेवत होते. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री ११ नंतर सर्व कर्मचारी निघून गेले. मध्यरात्रीनंतर पावणेदोनच्या सुमारास पाच ते सहा आरोपी मोटारसायकलने आले. पेट्रोलपंपाच्या दोन्ही भागात वेगवेगळ्या ठिकाणी मोटारसायकल ठेवून  आत शिरले. नूर खाँ यांचा खून केल्यानंतर आरोपी दोन-दोन करीत निघून गेले. दोघे पैसे असलेली तिजोरी (पेटी) तर दोघे डीव्हीआर घेऊन मोटारसायकलने ईश्‍वरनगरच्या दिशेने पळून गेले. केवळ २० मिनिटांमध्ये हा संपूर्ण घटनाक्रम घडला. आरोपी डीव्हीआर सोबत घेऊन गेले असले तरी समोरील, आजूबाजूची दुकाने आणि फ्लॅट स्कीममध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये घटनाक्रम कैद झाला आहे. 
पंपावरील कर्मचारी नेहमीप्रमाणे आज सव्वासहा वाजता कामावर आले. कर्मचाऱ्यांच्या येण्याची नोंद करण्याची जबाबदारी नूर खाँ यांची होती. 

यामुळे कर्मचारी येण्यापूर्वीच ते तयार असायचे. आज मात्र ते आतील ऑफिसमध्येच होते. झोप लागली असावी म्हणून कर्मचारी उठविण्यासाठी गेले असता ते जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसले. जवळच त्यांची कुऱ्हाड रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा, पंपाचे मालक  मुस्तफा हसन दाखल झाले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला.

आरोपी ओळखीतीलच!
नूर खाँ रात्री कुणालाही आत येऊ देत नव्हते. मात्र, रविवारी आरोपींना सहजच आत घेतले. पंपावरील पाळीव कुत्रा अपरिचितांवर सतत भुंकतो. पण, संपूर्ण थरारक घटनाक्रमादरम्यान कुत्रा आरोपींच्या मागेमागेच फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. मालकाच्या केबीनमधील तिजोरी तसेच डीव्हीआरची जागाही माहिती असल्याने आरोपी ओळखीतीलच असावेत, असा कयास लावला जात आहे. भांडे प्लॉट चौकात राहणारा एक कर्मचारी काही महिन्यांपूर्वीच इथले काम सोडून अन्य पंपावर गेला होता. घटनेपासून तो बेपत्ता असल्याने त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याची माहिती आहे. 

बॅंक हॉलिडे इफेक्‍ट?
बॅंकांना सलग चार दिवसांच्या सुट्या आल्या आहेत. यामुळे शुक्रवारपासूनच्या व्यवहारांतून मिळालेली रक्कम सर्वांकडेच जमा झाली आहे. बॅंकांना सुटी असण्याच्या दिवसांमध्ये या  पंपावरील पैसे तिथेच राहत होते. तीन दिवसांत गोळा झालेली १२ लाख ५६ हजार १७० रुपये तिजोरीत होते. याची पुरेपूर कल्पना आरोपींना असावी. वयोवृद्ध नूर खाँ फारसा प्रतिकार करू शकणार नसल्याचेही आरोपींना माहीत होते. यामुळेच आरोपींनी दरोड्यासाठी रविवारी मध्यरात्रीनंतरची वेळ निवडली. 

बिअर शॉपी परिसर गुन्हेगारांचा अड्डा
गुरुदेवनगर पेट्रोल पंपासमोरील एनआयटी कॉम्प्लेक्‍समध्ये बिअर शॉपी असून या परिसरात रात्री मद्यपींची जत्राच भरते. रात्री उशिरापर्यंत मद्याचे पॅले रिचविण्याचा क्रम सुरू असतो. त्यात गुन्हेगारांचाही वावर असतो. हीच बाब आरोपींना पेट्रोल पंपावर पाळत ठेवण्यासाठी उपयोगी ठरली असावी, अशी स्थानिक नागरिकांची दृढ शंका आहे. अशाप्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मद्यपींचा वावर कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली.

आज पाच तास पेट्रोलपंप बंद
पेट्रोलपंपावरील दरोडा व कर्मचाऱ्याच्या हत्येच्या निषेधार्थ शहरातील पेट्रोलपंप मंगळवारी (ता.१) दुपारी १२ ते सायंकाळी ५ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबत कळविले आहे.

Web Title: robbery security murder crime