
प्रफुल्ल विलास ठाकरे (वय 37) हे कुटुंबासह देवदर्शनासाठी काही दिवसांपूर्वीच पचमढी येथे गेले होते. बाहेर असतानाच शेजाऱ्यांनी त्यांना फोन केला.
अमरावती : गाडगेनगरहद्दीत घरफोड्यांची श्रृंखला अद्याप थांबलेली नाही. दोन घरफोड्यांच्या घटनांमध्ये रोख रक्कमेसह ऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने व इतर, असा लाखो रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला.
हेही वाचा - हृदयद्रावक! खेळता-खेळता स्वयंपाकघरात पोहोचली, आई गंSSS ओरडली अन् सोडला जीव
नीलक्रांती सोसायटी, मोहननगर येथील प्रफुल्ल विलास ठाकरे (वय 37) हे कुटुंबासह देवदर्शनासाठी काही दिवसांपूर्वीच पचमढी येथे गेले होते. बाहेर असतानाच शेजाऱ्यांनी त्यांना घरफोडी झाल्याची माहिती दिली. अमरावतीत परत आले असता चोरट्यांनी घरात चांगलाच धुमाकूळ घातल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरातील तीन ते चार कपाटे फोडली होती. सोन्याची मोहन माळ 30 ग्रॅम, 12 ग्रॅमचे नेकलेस, 10 ग्रॅम वजनाचे दोन गोप, 5 व 3 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, लॉकेट, कानातील रिंग, सोन्याचे तुकडे, असे 80 ग्रॅमचे दागिने व 12 हजारांची रोख रक्कम, पाच हजारांची एक सायकल, असा 1 लाख 37 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. प्रफुल्ल ठाकरे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : अंकिताने सांगितले होते आरोपीचे नाव; पहिल्या दिवशी नोंदविली तिघांची साक्ष
दुसरी घरफोडीची घटना पंचवटी चौक येथील पवार कॉम्प्लेक्समध्ये घडली. संजय पांडुरंग पवार (वय 58, रा. अंबापेठ) हे महत्त्वाच्या कामासाठी पुणे येथे गेले असताना चोरट्यांनी त्यांच्याही बंद घराला लक्ष्य केले. पाण्याची 4 हजार रुपयांची मोटार, एक जुना वापरात असलेला 15 हजार रुपयांचा कॅमेरा, असा एकूण 19 हजार रुपयांचा ऐवज त्यांच्या घराच्या आवारातून चोरला. पवार यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. घरफोडीच्या ठिकाणी श्वानपथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.