esakal | चोरांनी फोडले मद्याचे दुकान, अमरावती जिल्ह्यातील सातवी घटना
sakal

बोलून बातमी शोधा

daru chori

भातकुलीत बार ऍण्ड रेस्टॉरंट तर अचलपुरातील देशीदारूचे दुकान चोरट्यांनी फोडले. दोन्ही ठिकाणांहून 2 लाख, 62 हजार 965 रुपयांचे मद्य चोरीस गेले. त्यापैकी भातकुली येथील बार जिल्हा प्रशासनाच्या आदेशामुळे बंद होता.

चोरांनी फोडले मद्याचे दुकान, अमरावती जिल्ह्यातील सातवी घटना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : लॉकडाउनच्या काळात इतर व्यवहारांबरोबरच मद्यविक्रीही बंद होती. परिणामी दारूप्रेमी अस्वस्थ होते. त्यामुळे त्याकाळात दारूची दुकाने फोडण्याच्या अनेक घटना घडत होत्या. आता शासनाने दारू विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे दारू प्रेमींना दिलासा मिळाला आहे. परंतु तरीही काही चोरट्यांनी दारू दुकान फोडल्याच्या दोन घटना नुकत्याच घडल्या.
भातकुलीत बार ऍण्ड रेस्टॉरंट तर अचलपुरातील देशीदारूचे दुकान चोरट्यांनी फोडले. दोन्ही ठिकाणांहून 2 लाख, 62 हजार 965 रुपयांचे मद्य चोरीस गेले. त्यापैकी भातकुली येथील बार जिल्हा प्रशासनाच्या आदेशामुळे बंद होता.
आयुक्तालयाच्या हद्दीत भातकुली ते सायत मार्गावरील शिवाई बार ऍण्ड रेस्टॉरंट जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने 21 मार्च 2020 पासून सील लागल्याने बंद होते. बुधवारी (ता. तीन) बारमालक रामेश्‍वर नागमोते यांनी बार परिसरात जाऊन पाहणी केली असता, बारचे एक दार तुटून सामग्री अस्ताव्यस्त दिसली. चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. येथील व्यवस्थापक नंदकिशोर कांबे यांच्या तक्रारीवरून भातकुली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनास्थळी श्‍वानपथक, ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. जिल्ह्यात लॉकडाउन काळात बंद असलेले विदेशी मद्यविक्रीची प्रतिष्ठाने फोडल्याची जिल्ह्यातील ही सातवी घटना आहे.

सविस्तर वाचा -उपराजधानीत हत्याकांडांची मालिका, कायदा व सुव्यवस्थेचा उपस्थित झाला प्रश्‍न

अचलपूर तालुक्‍यात भूगाव येथील संजय पांडुरंग हूड (वय 50) यांचे देशी दारू विक्रीचे दुकानही चोरट्यांनी फोडले. जवळपास 70 पेट्या बिअर, 2 हजारांची रोख रक्कम, असे एकूण 1 लाख, 61 हजार 455 रुपयांची दारू चोरली. चोरी करून पळताना पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. माल चोरल्यानंतर या दुकानात असलेले बहुतांश सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चोरट्यांनी पळून जाण्यापूर्वी तोडफोड केली. इतर सामग्रीचेही नुकसान केले. श्री. हूड यांच्या तक्रारीवरून सरमसपुरा ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.