
२७ ऑगस्ट २०१९ च्या शासन इतिवृतानुसार महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात मानधन वाढ देण्यात आली आहे. परंतु १४ महिने लोटूनही गोंदिया जिल्ह्याला मानधनवाढ मिळाली नाही.
सडक अर्जुनी (जि. गोंदिया) : गोंदिया जिल्ह्यातील १३९ कार्यरत रोजगार हमी योजना कर्मचाऱ्यांना गेले १४ महिने उलटूनही मानधनवाढ तसेच ११ महिन्यांचे नियुक्ती आदेश न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेत गणल्या जाणाऱ्या व खेड्यापाड्यातील लोकांना रोजगार उपलब्ध करून जीवनमान उंचावण्यास हातभार लावणारी, अशी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे.
याशिवाय ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी काम करणारे गोंदिया जिल्ह्यातील १३९ रोहयो कर्मचारी १० ते १२ वर्षांपासून अत्यल्प कमी मानधनात कामे करीत आत. मात्र त्यांना मागील १४ महिन्यांपासून वाढीव मानधन मिळालेले नाही. यामुळे रोहयो कर्मचाऱ्याचे आर्थिक नुकसान होत आहे.
जाणून घ्या : नक्षलवाद्यांशी लढणारे हात सरसावले बेरोजगारांसाठी, १४० तरुणांना दिला रोजगार
२० ऑक्टोबरला रोजगार हमी योजना कर्मचाऱ्यांचे नियुक्तीचे आदेश संपुष्टात आले असल्याने १९ ऑक्टोबरला ११ महिन्याचे नियुक्ती आदेशाचे निवेदन देण्यात आले आहे. तसेच २७ ऑक्टोबरला व ९ नोव्हेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना ११ महिन्यांचे मानधनवाढीसह नियुक्ती आदेश मिळण्यासाठी निवेदन देण्यात आलेले आहे.
२७ ऑगस्ट २०१९ च्या शासन इतिवृतानुसार महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात मानधन वाढ देण्यात आली आहे. परंतु १४ महिने लोटूनही गोंदिया जिल्ह्याला मानधनवाढ मिळाली नाही. वारंवार निवेदन देऊनही कोणत्याच प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील १३९ कार्यरत कर्मचारी यांना नाइलाजास्तव लेखणी बंद (कामबंद) संप पुकारावे लागले. गोंदिया जिल्ह्यातील १३९ कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे सर्वांत जास्त रोजगार उपलब्ध करून लोकांना रोजगार देणारा जिल्हा म्हणून सन २०१५-१६ व १६-१७ मध्ये संपूर्ण भारतात गोंदिया जिल्हा पहिल्या क्रमांकावर होता. तसेच सन २०१७-१८ मध्ये राज्यात गोंदिया जिल्हा नंबर एकवर होता.
अवश्य वाचा : प्रत्येकाच्या मागे ईडी लागलीय, संपूर्ण ताकदीनिशी सामना करू - प्रफुल्ल पटेल
सध्या कोविड - १९ या वैश्विक महामारीमुळे संपूर्ण जग हादरले आहे. अशात मजुरांना रोजगार देण्याचे काम मग्रारोहयो ही योजना करत आहे. यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता प्रामाणिकपणे व अविरत रोहयो कर्मचारी अत्यल्प कमी मानधनात रोहयोची उद्दिष्ट पूर्तीसाठी सर्व कामे करीत आहेत. अशातच देवरी पंचायत समितीचे रोहयो कर्मचारी संजू डोये हे कोविडग्रस्त होऊन मृत्यू पावले. तसेच सध्या कोविड-१९च्या डाटा एन्ट्रीची कामे करूनही त्यांच्याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नाही. त्यामुळे यावर लक्ष घालून त्वरित न्याय द्यावे, अशी मागणी रोहयो कर्मचाऱ्यांनी केली आहे.
(संपादन : दुलिराम रहागंडाले)