सुखद...रूफ टॉप फार्मिंग जगभरात ट्रेंडिंग

प्रशांत रॉय
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

यामुळे कीटक, कीड आणि रसायनांच्या वापर टाळला जाणार असून प्रदूषण आणि आरोग्याला अपायकारक असलेल्या बाबींवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळविता येणार आहे

नागपूर : काही दशकांपूर्वी एक मराठी चित्रपट आला होता. त्यामध्ये नायिका आपल्या माहेराची आठवण काढून "माळ्याच्या मळ्यामंधी पाटाचं पाणी जातं' हे गीत होतं. या गाण्यात झुळझुळणारं पाणी, बैल, तरारलेलं पीक असं डोळ्याचं पारणं फेडणारी शेती होती. शांत परंतु आत्मभान विसरायला लावणारा निसर्ग असं सगळं होतं. आता काळ बदलला. गावखेड्यातील युवकांचा महानगरांकडे जास्त ओढा आहे. शहरांमध्ये मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. जमीन नावालाच शिल्लक आहे. गावातील तरुण शहरता असल्यामुळे शेतीकडे कोण पाहणार हा प्रश्‍नही आहे. खाणारी तोंडे सतत वाढत असून यांना सकस अन्न कसे पुरवायचे याविषयी जगभरात चर्चा होत आहे. नवीन तंत्रज्ञान, आधुनिकीकरणाचा वापर शेतीमध्ये होत आहे. तरीही मनुष्यबळ आणि जागेची अनुपलब्धता आहेच. यावर मार्ग म्हणून रूफ टॉप फार्मिंग/अर्बन फार्मिंगकडे (गच्चीवरील शेती) आशेने पाहिले जात आहे.

महाराष्ट्रात अर्बन फार्मींगला अच्छे दिन
गच्चीवर वाफ्यांमधून साखळी पद्धतीने फळे, फुलांसह पालेभाज्या लावता येतात. तसेच इतर पिकांचेही उत्पादन घेण्यासाठी प्रयोग, चाचण्या केल्या जात आहेत. हायड्रोपोनिक्‍स पद्धतीमध्ये मातीचा वापर न करता पीक उत्पादन घेता येणे शक्‍य होत आहे. यामुळे कीटक, कीड आणि रसायनांच्या वापर टाळला जाणार असून प्रदूषण आणि आरोग्याला अपायकारक असलेल्या बाबींवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळविता येणार आहे. चीन, सिंगापूर, हॉंगकॉंगसह युरोप आणि अमेरिकेतही रूफ टॉप फार्मिंगला पसंती मिळत आहे. खर्च व मेहनत कमी आणि चांगल्या उत्पादनासह उत्पन्नाची हमी यामुळे ही पद्धती भारतातही जोर पकडत असून महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी याचा वापर होत आहे.

असे आहे पॅरिसमधील अर्बन ओऍसीस
जागा :14 हजार वर्गमीटर
पीक : 30 विविध प्रकारची
पद्धती : सेंद्रिय
देखरेखीसाठी : 20 गार्डनर
दिवसाला हजार किलो फळे व भाजीपाला प्रतिदिवस
300 लोकांसाठी रेस्टॉरंटचीही सोय

सर्वांत मोठे अर्बन फार्म
फ्रान्सची राजधानी असलेले पॅरिस हे फॅशनसह अनेक बाबतीत जगातील हॅपनिंग शहर म्हणून ओळखले जाते. येथील लोकांना व पर्यटकांना सेंद्रिय अन्न मिळावे, मोठमोठ्या इमारतींमध्ये कुठेतरी डोळ्याला सुखद अनुभव देणारा ग्रीन बेल्ट असावा आदींचा विचार करून येथे जगातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा अर्बन फार्म उभारण्याचे नियोजन आहे. 2020 मध्ये हा फार्म आकाराला येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे येथील नागरिकांना अर्बन फार्ममध्ये उपलब्ध असलेल्या जमिनीचा छोटा तुकडा लीजवर घेता येणार आहे.

गच्चीवरील सेंद्रिय मेवा
पालेभाज्या : मेथी, पालक
फळभाज्या : टोमॅटो, मिरची, वांगी, कोबी, फ्लॉवर
कंदपिके : बिट, मुळा, गाजर
वेल : काकडी, घोसाळी, शिराळी, दुधी, कारली, तोंडली
औषधी वनस्पती : कोरफड, गवती चहा, पुदीना, आले, हळद आदी.
फळे : लिंबू, पपई, आंबा, केळी, पेरू आदी.
फुले : गुलाब, जास्वंद, परिजात, रातराणी, जाईजुई, मोगरा तसेच ड्रममध्ये चाफा, बकुळीचे कलम लावून आपण सुगंधी फुले घेऊ शकतो.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: roof top farming, urban farming, agriculture