राहुल गांधींना भेटण्यासाठी पायी यात्रा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

खापरखेडा - तीन राज्यांत भाजपचा पराभव करून काँग्रेस मित्र पक्षाने दणदणीत विजय मिळविला. केंद्रातसुद्धा काँग्रेस मित्र पक्षांनी सरकार स्थापन करावे व युवा नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा बाळगून खापरखेडा चिचोली परिसरातील एका काँग्रेसप्रेमी युवकाने दिल्लीची थेट पायी यात्रा सुरू केली. रोशन संजय बागडे (वय ३०, चिचोली वॉर्ड क्रमांक १) असे या युवकाचे नाव आहे.

रोशनने दिल्लीला जाण्यासाठी ३ जानेवारीपासून वाकी येथे ताजुद्दीन बाबांचे दर्शन घेऊन पायी यात्रेला सुरुवात केली. हातात तिरंगा झेंडा, खाकेत बॅग, अंगात राहुल गांधींचे चित्र रेखाटलेले टी शर्ट, जॅकेट घालून रोशन एकटाच दिल्लीच्या सफरीवर निघाला आहे. दररोज रोशन २५ किलोमीटर अंतर पायी चालतो. खापरखेड्यापासून दिल्लीचे अंतर जवळपास १ हजार ५९ किलोमीटर असून दिल्लीला पोहोचण्यासाठी रोशनला दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. २५ किलोमीटर पायी यात्रा केल्यानंतर मार्गावरच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात रोशन मुक्कामी असतो. दिल्ली पायी वारीसंदर्भात रोशनला अधिक माहिती विचारली असता राहुल गांधी युवा नेते आहेत. त्यांनी देशाचे नेतृत्व करावे व पंतप्रधान व्हावे, अशी मनोमन इच्छा आहे. त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीला जात असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. रोशनच्या पायी यात्रेदरम्यान ठिकठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार स्वागत करीत असून रोशनच्या पुढील यात्रेला शुभकामना दिल्या आहेत.  रोशन यात्रेदरम्यान कुणाचीही आर्थिक मदत घेत नसून त्याची पायी वारी दिल्ली येथे पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांची भेट घडवून द्यावी, असे आवर्जून काँग्रेसच्या नेत्यांना सांगत आहे. आमदार सुनील केदार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते रत्नदीप रंगारी, सरपंच रवींद्र चिखले, पुरुषोत्तम चांदेकर, उदय महाजन, प्रफुल शेंडे, अभय मिश्रा, सुनील तांबडे यांनी रोशनच्या पायी यात्रेला शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Roshan bagde to meet Rahul Gandhi