हिंगोली : बाळापुरात वीस लाखांचा गुटखा पकडला

विनायक हेंद्रे
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

कळमनुरी तालुक्यातील जांब ते सिंदगी शिवारामध्ये एका शेतातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल वीस लाख रुपयांचा गुटखा मंगळवारी ( ता.२४ ) रात्री जप्त केला आहे.

आखाडा बाळापूर, ( जि. हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील जांब ते सिंदगी शिवारामध्ये एका शेतातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल वीस लाख रुपयांचा गुटखा मंगळवारी ( ता.२४ ) रात्री जप्त केला आहे. या प्रकरणी एकास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

कळमनुरी तालुक्यातील जांब ते सिंदगी शिवारामध्ये एका शेतात टिन शेडमध्ये गुटखा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक योगेश कुमार अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक जगदीश भंडरवार, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे जमादार बालाजी बोके, श्री थोरात, श्री सावळे, विलास सोनवणे, संभाजी लेकुळे आशिष उंबरकर, विठ्ठल कोळेकर, सुनील अंभोरे, यांच्या पथकाने रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास शेतात जाऊन शेड वर छापा मारला.

या टीन शेडमध्ये 126 पोते गुटखा आढळून आला आहे. गोवा व इतर प्रकाराच्या असलेल्या गुटख्याची किंमत तब्बल वीस लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. आखाडा बाळापूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच गुटखा ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेली ही मोठी कामगिरी आहे. शेतातील टिन शेड मध्ये गुटखा ठेवून त्याची जिल्हाभरात विल्हेवाट लावण्याचा प्रकार सुरू असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान हा गुटका कर्नाटकातून आणण्यात आला असून यापूर्वी परभणी भागात विक्री केला जात होता. मात्र आता हिंगोली जिल्ह्यांमध्ये अवैध रीतीने गुटख्याची विक्री करण्यासाठी हा गुटका साठवून ठेवण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरी नंतर जिल्हाभरात गुटखा विक्रीची ठिकठिकाणी केंद्र असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. गुन्हे शाखेने जप्त केलेला 20 लाख रुपयांच्या गुटख्याची पोते आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. या संदर्भामध्ये परभणीच्‍या अअन्न व औषध प्रशासनाला माहिती देण्यात आली असून पोलिसांनी शेत मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rs 20 lakh gutkha seized in hingoli