RTE Admission
RTE Admission

आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांना मागितले जाते ‘ॲक्टिव्‍हिटी’ शुल्क

नागपूर - शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत २५ टक्के गरीब विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पहिली सोडत जाहीर करुन त्याअंतर्गत तीन हजाराहून अधिक बालकांना प्रवेश देण्यात आला. मात्र, आता प्रवेश झालेल्या बालकांच्या पालकांकडून ‘ॲक्‍टीव्हीटी’ शुल्काच्या नावावर अधिकचे पैसे उकळण्यात येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे प्रवेश झाल्यानंतर आता पालकांची चिंता वाढली आहे. 

आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील मुलांना खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये ‘आरटीई’अंतर्गत मोफत प्रवेश देण्यात येतात. यासाठी २ लाख ४४ हजार ९३२ ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात आले होते. प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी काढण्यात आलेल्या लॉटरीत ६७ हजार ७०६ विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला. यातील ४६ हजार ८९९ विद्यार्थ्यांचाच प्रवेश निश्‍चित झाला आहे. नागपुरात ५ हजार ७०१ बालकांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी १० मेपर्यंत ३ हजार ९०४ बालकांना प्रवेश देण्यात आला. 

प्रवेश दिल्यानंतर पालकांना बोलावून घेत, आरटीईअंतर्गत प्रवेश घेतलेल्या बालकांना इतर सामान्य बालकांप्रमाणेच ॲक्‍टीव्हीटीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी अतिरिक्त शुल्काची मागणी करण्यात येत आहे. काही पालक मुकाट्याने शुल्क देत असल्याचे समजते. मात्र, गरीब असलेल्या पालकांना हाही खर्च झेपत नसल्याने त्यांना हे शुल्क देणे शक्‍य नसल्याने त्यांनी आरटीई ॲक्‍शन समितीकडे तक्रारी नोंदविल्या आहेत. विशेष म्हणजे शालेय साहित्याच्या खरेदीतूनही आरटीईतून प्रवेश घेतलेल्या बालकांच्या पालकांकडून पैसे वसूल करण्याचा धंदा काही शाळांनी सुरू केला आहे. 

केंद्र सरकारच्या अध्यादेशानुसार सीबीएसई शाळांमध्ये एनसीईआरटीच्या पुस्तकाच खरेदी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, शाळांकडून अभ्यासक्रमात बदल करून त्या खासगी पब्लिकेशनकडून पुस्तका खरेदी करण्याची सक्ती करीत असल्याचे समजते. त्यामुळे पालकांमध्ये बराच रोष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com